
नाशिक, २७ ऑगस्ट (हिं.स.) : मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अपूर्ण राहिलेली अनेक कामे विद्यमान कार्यकारिणीला पूर्ण करावी लागत असून, ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडली जात आहे. संस्थेवर आलेला सुमारे १३५ कोटी रुपयांचा कर्जाचा भार, बांधकाम ठेकेदारांची देणी तसेच सध्या चर्चेत असलेल्या मविप्र रुग्णालयाच्या प्रश्नासह अनेक आव्हाने आम्हाला वारशाने मिळाली आहेत, अशी भूमिका मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मांडली.
मविप्र रुग्णालयासंदर्भातील सद्यस्थितीचाही उगम मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळातच झाला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्या काळात आवश्यक परवानग्यांची मुदतवाढ अथवा संबंधित कार्यवाही वेळेत होणे अपेक्षित होते; मात्र ती झाली नाही. त्यानंतर परिस्थितीत बदल झाला असून संबंधित कायदे व नियमांमध्येही बदल झाले. त्याचबरोबर न्यायालयाचे नवे आदेशही आले आहेत.
या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विद्यमान कार्यकारिणी कायदेशीर तसेच प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने काम करीत आहे. मविप्र रुग्णालयाच्या प्रश्नातून निश्चितपणे योग्य मार्ग काढला जाईल, असा विश्वासही ॲड. ठाकरे यांनी व्यक्त केला.
संस्थेवर आलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, त्याच जबाबदारीने मविप्र रुग्णालयाचा प्रश्नही मार्गी लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. संवेदनशील विषयांवर माध्यमांमधून आरोप-प्रत्यारोप अथवा अनावश्यक चर्चा करून संस्थेचे हित साधले जात नाही. संस्थेच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा ते सोडविण्यासाठी सकारात्मक योगदान देणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य
“मविप्रसारखी शतकोत्तर परंपरा असलेली संस्था ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका कार्यकारिणीची कामगिरी नाही. या संस्थेच्या वाटचालीचे खरे श्रेय कर्मवीरांच्या त्यागाला, असंख्य समाजधुरिणांच्या योगदानाला आणि संस्थेवर अखंड विश्वास ठेवणाऱ्या हजारो सभासदांना आहे. त्या विश्वासाचे जतन करणे आणि संस्थेचे हित सर्वोच्च मानून प्रत्येक प्रश्न मार्गी लावणे, हीच विद्यमान कार्यकारिणीची भूमिका आहे,” असे मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI