अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ
* मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा मुंबई, २७ ऑगस्ट (हिं.स.) : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
रिक्शा टॅक्सी चालक


* मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

मुंबई, २७ ऑगस्ट (हिं.स.) : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत मराठी बोलता येत नसलेल्या रिक्षाचालकांवर त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येत होती.

रिक्षा-टॅक्सी चालक आणि मालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. मात्र एका वर्षाच्या काळात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक हे मराठी शिकतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेल्या समितीने दिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचे ऑटो चालक आणि रिक्षा चालकांनी भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये जुजबी मराठी का होईना ते आलंच पाहिजे आणि ते शिकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भविष्यातही ते प्रयत्न सुरूच असतील. मात्र वेगवेगळ्या वयोगटातील टॅक्सी चालकाना एवढ्या कमी वयात मराठी शिकणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येत आहे. या दरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. या काळात त्यांनी जुजबी मराठी शिकावं. समोरून येऊन त्यांनी ही वेळ मागितल्याने त्यांना वेळ देणं गरजेचं होतं.

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मालकांना मराठी येणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या अमराठी रिक्षा चालकांना मराठी न आल्यास त्यांना एक महिन्याची नोटीस देणार होती. तसेच तरिही त्याला एक महिन्यात मराठी आलं नाही तर त्याचे लायसन्स आणि बॅच निलंबित करण्यात येणार होते आणि त्याला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार होता. या तीन महिन्यांतही त्याला मराठी शिकता नाही आली तर त्याचे लायसन्स रद्द केले जाणार होते. 12 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार ही कारवाई केली जाणार होती. पण मुख्यमंत्र्यांची अचानक या कारवाईला स्थगिती देत रिक्षा-टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

या भेटीवेळी शिष्टमंडळाने मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मागितली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. या एक वर्षात अमराठी चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

जवळपास 1 लाख 60 हजार अमराठी मराठी भाषा शिकले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो. त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोट बांधली. त्यामुळे जवळपास 1 लाख 60 हजार अमराठी मराठी भाषा शिकले. त्यापैकी 15 ते 20 हजार ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाला मी स्वत: उपस्थित होतो. जुजबी मराठी भाषा शिकण्याची गोडी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांमध्ये बघायला मिळाली.

परिवहन विभागाने मराठी भाषा आपल्या व्यवहारात प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका घेतली. मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याची जी भूमिका 1 लाख 60 हजार लोकांनी घेतली. त्यांचे धन्यवाद देतो. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि त्यांच्या परिवहन विभागाने मराठी शिकवण्याचं अभियान राबवलं. मराठी लेखक, तज्ज्ञ आणि साहित्यिकांना घेऊन मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सुर ठेवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच लोकांची मागणी लक्षात घेऊन या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. मी एवढंच सांगेन, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.

मुदतवाढ दिली तरी, मराठी शिकणे अनिवार्यच राहील - प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी, मराठी शिकणे अनिवार्यच राहील, असा ठाम पवित्रा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते असल्याने त्यांचा निर्णय बंधनकारक असला तरी, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande