
नवी दिल्ली, २७ ऑगस्ट (हि.स.) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जपानचा चार दिवसीय दौरा पूर्ण केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जपानी कंपन्या आणि वित्तीय संस्थांना भारतातील गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले. तसेच, पुढील 10 वर्षांत जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येन खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावेळी जपानी कंपन्यांनी भारतातील सेमीकंडक्टर आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील आपली उपस्थिती वाढविण्यात स्वारस्य व्यक्त केले. दोन्ही देशांनी औद्योगिक भागीदारीला नवी गती देण्यावरही सहमती दर्शवली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोयल यांनी या दौऱ्यात टोकियो, नागोया आणि ओसाका येथे उच्चस्तरीय बैठका तसेच रोडशोमध्ये सहभाग घेतला. त्यांनी जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगमंत्री रयोसेई अकाझावा, तसेच जेईटीआरओ, जेबीआयसी आणि जेआयसीएच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चांमध्ये गुंतवणुकीचा विस्तार, पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे, तंत्रज्ञान भागीदारी आणि द्विपक्षीय सहकार्याच्या नव्या संधी यावर विशेष भर देण्यात आला.
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर आयोजित विशेष गोलमेज बैठकीत गोयल यांनी भारताची सहा स्तंभांवर आधारित सेमीकंडक्टर धोरणाची रूपरेषा मांडली. भारतातील युवा प्रतिभा आणि जपानची तांत्रिक क्षमता यांचा मेळ घातल्यास जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणता येईल, असे त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी सेमीकंडक्टर सामग्री, उपकरणे, पॉवर सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्याची इच्छा व्यक्त केली.
नागोया येथे आयोजित इंडिया-जपान नेक्स्ट जनरेशन इकॉनॉमिक पार्टनरशिप रोडशोमध्ये 80 हून अधिक जपानी कंपन्यांनी सहभाग घेतला. या वेळी वाहन उद्योग, एअरोस्पेस, मशीन टूल्स, इलेक्ट्रॉनिक्स तसेच लघु आणि मध्यम उद्योगांमधील सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली. भारतातील युवा प्रतिभा आणि जपानच्या तांत्रिक कौशल्याचा संगम नवीन औद्योगिक आणि तंत्रज्ञान भागीदारीसाठी मार्ग प्रशस्त करेल, असे गोयल यांनी नमूद केले.
गोयल यांनी सांगितले की, जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही भारतीय अर्थव्यवस्थेने 7.7 टक्के वाढ नोंदवली असून, 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. भारतातील वाढता मध्यमवर्ग, डिजिटल अर्थव्यवस्था, मजबूत बँकिंग क्षेत्र आणि अक्षय ऊर्जा क्षमता यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी