
‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय क्रीडा महोत्सव
नंदुरबार, 27 ऑगस्ट (हिं.स.) : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. क्रीडा व खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा, शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचावे आणि युवक-युवतींमध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबारच्या वतीने 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
यावर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असून ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ‘फ्लोरल ट्रिब्यूट’द्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच ‘29 आव्हाने’ (29 Challenges) या उपक्रमांतर्गत खेळाडू व नागरिकांना कोणताही क्रीडा प्रकार 29 वेळा करण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
या उपक्रमात हॉकी ड्रिबल, फुटबॉल किक, बास्केटबॉल ड्रिबल, स्कीपिंग, हॉकी पेनल्टी शूटआऊट, धावणे, 3 किलोमीटर चालणे, पुश-अप्स, सिट-अप्स आणि रस्सीखेच आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. सहभागी खेळाडूंनी या उपक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे ‘मेजर ध्यानचंद हॉकी चषक स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिक आणि खेळाडूंमध्ये हॉकीसह विविध खेळांविषयी उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा 30 ऑगस्ट रोजी समारोप करण्यात येणार असून, विविध स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी होईल.
निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यासोबतच जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडू, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबारच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर