नेपाळमध्ये अडकलेल्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू - उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.) : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वयाने प्रयत्न सुरू असून, शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही मदतीसाठी सक्रिय झाली आ
dcm-eknath-shinde-


मुंबई, 27 ऑगस्ट, (हिं.स.) : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वयाने प्रयत्न सुरू असून, शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही मदतीसाठी सक्रिय झाली आहे. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिक अडकले असून त्यामध्ये सातारा, महाबळेश्वर आणि पुणे परिसरातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे तसेच त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

नेपाळमधील परिस्थिती अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राच्या पातळीवर नेपाळला मदतीचा हात पुढे केला आहे. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली भूमिका असून, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन टीम समन्वयाने काम करत आहे. नेपाळमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, परिवहन विभागाच्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाचे शिंदे यांनी कौतुक केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून राबवलेल्या या अभियानामुळे सुमारे १ लाख ६० हजार अमराठी नागरिकांनी मराठी भाषा शिकली, तर मुंबईतील सुमारे १५ ते २० हजार ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. व्यवहारातील मराठी शिकण्याची गोडी अन्य भाषिकांमध्ये निर्माण झाल्याचे समाधान असल्याचे शिंदे म्हणाले. साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषेतील तज्ज्ञांच्या सहभागातून हे अभियान राबविण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मुदतवाढ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुंबईत आलेल्या ‘लाडक्या बहिणींनी’ शिंदे यांना राखी बांधली. या प्रेमाबद्दल त्यांनी बहिणींचे आभार मानले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३२ जागा मिळाल्या असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील या विक्रमी विजयात ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजना सातत्याने सुरू राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनुसार महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव जोपासण्याचे काम सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.

*प्रो-गोविंदाला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्वरूप देण्याचा प्रयत्न*

‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून या पारंपरिक खेळाला व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. युवासेनेचे पूर्वेश सरनाईक गेल्या चार वर्षांपासून यासाठी मेहनत घेत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना गोविंदा उत्सवावरील निर्बंध दूर केले, गोविंदांचा विमा काढला, गोविंदासाठी सुट्टी जाहीर केली आणि राज्याच्या क्रीडा प्रकारांमध्ये गोविंदाचा समावेश केला. महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना स्पेनमध्येही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोविंदा हा केवळ उत्सव नसून टीमवर्क, सांघिक भावना, शिस्त आणि कौशल्याचा खेळ आहे. जमिनीवरचा हा खेळ मॅटवर पोहोचला असून आता स्पेनपर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. ठाण्यात गोविंदा पथकांनी नऊ आणि दहा थरांचे मानवी मनोरे उभारण्यास सुरुवात केली आहे. हा खेळ भविष्यात कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावा, हे आपले लक्ष्य आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande