ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी
ठाणे, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज य
*ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी*


ठाणे, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी घेवून मॅरेथॉनच्या संपूर्ण नियोजनाचा सविस्तर आढावा घेत असतानाच आतापर्यत 30 हजार स्पर्धकांची नोंदणी झाली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या विद्यमाने होत असलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची अंतिम बैठक आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक राम रेपाळे, अतिरिक्त आयुक्त 1 मनिष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, पोलीस विभागाचे कर्मचारी, वाहतूक विभाग, महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पावसाळी वातावरण, रस्त्यांची परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणावर सहभागी होणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, बॅरिकेडिंग, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वयंसेवकांची नियुक्ती ही सर्व तयारी झाल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी सर्व विभागांकडून घेतला.

यंदा तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने प्रत्येक सहभागी सुरक्षितपणे स्पर्धेत सहभागी होऊन सुखरूप घरी परत जाईल, यावर प्रशासनाचा भर असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, शाळा, शिक्षक, बसचालक आणि स्वयंसेवकांशी समन्वय साधण्यात आला आहे.

स्पर्धेच्या ठिकाणी व स्पर्धा मार्गावर आरोग्य विभागाने १० डॉक्टरांची पथके, रुग्णवाहिका, ऑन-कॉल वैद्यकीय सेवा तसेच मार्गावरील रुग्णालयांमध्ये राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. स्वच्छता विभागाने मार्गावरील शौचालये, मोबाईल टॉयलेट्स आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले. तसेच दिनांक 28 व 29 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयात स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती आवश्यक आहे त्या ठिकाणी कामे सुरूच आहे. परंतु मॅरेथॉनच्या मार्गावरील खड्डे बुजवणे, अतिक्रमण हटवणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या. तसेच 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही सकाळी 6.00 वा सुरू होणार असली तरी संपूर्ण शहरातील पोलीस प्रशासन हे स्पर्धेच्या पूर्वसंध्येपासून तयारी करीत असतात. तसेच पहाटेपासून सर्व ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व पोलीसांचे कौतुक केले. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा जेव्हा सोडली जाते तेव्हा विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी दुतर्फा स्वयंसेवक ठेवावेत अशी सूचना देखील त्यांनी केली.

सर्व विभागांनी समन्वयाने काम करून ठाण्याची ओळख ठरणारी ही मॅरेथॉन यशस्वी करण्याचे आवाहन केले. महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध विभागांच्या समन्वयातून यंदाची 32 ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी व्यक्त केला.

कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

यंदाच्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मॅरेथॉनवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मॅरेथॉनच्या मंचावर उपस्थ‍ित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मीनल पालांडे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande