
डोंबिवली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड, खेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशभक्त चाकरमान्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर मोफत बससेवेच्या तिकीट वितरणाचा सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
विशेष म्हणजे तिकीट वितरण सोहळ्याला कोकणातील पारंपरिक लोककलेची जोड देण्यात आली असून गण-गवळण, जाखडी-बाल्या नृत्य, दशावतार, पालखी नृत्य, शक्ती-तुरा आणि डबल बारी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा, गावदेवी मंदिर मैदान येथे सायंकाळी ५ वाजता शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे कोकणातील लोककलेचे सादरीकरण होणार आहे. तर कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी नांदिवली येथील गावदेवी मंदिर तलावाशेजारील तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता शक्ती-तुरा डबल बारीचा जंगी सामना रंगणार आहे. शाहीर सचिन कदम आणि शाहीर तुषार पांदेरे यांच्यात हा सामना होणार आहे. या सोहळ्याला गणेशभक्त चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच आमदार राजेश मोरे यांनी केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi