अमरावतीतील मुठवा बाबा चबुतऱ्याजवळील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था
- देवस्थानाकडे जाणारा रस्ता चिखलात - वाहनांमुळे घाणेरडे पाणी उडून मूर्तीची विटंबना; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)। काटकुंभ येथील समस्त ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मुठवा बाबा चबुतऱ्याजवळील रस्त्याची पावसा
देवस्थानाकडे जाणारा रस्ता चिखलात


- देवस्थानाकडे जाणारा रस्ता चिखलात

- वाहनांमुळे घाणेरडे पाणी उडून मूर्तीची विटंबना; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये रोष

अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

काटकुंभ येथील समस्त ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मुठवा बाबा चबुतऱ्याजवळील रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या चिखलयुक्त व घाणेरड्या पाण्यातून वाहने जाताना पाणी थेट चौबूतर्यावर उडत असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या मुठवा बाबा यांच्या चौबूतर्यावर रस्त्यावरील घाणेरडे पाणी उडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, पायी जाणाऱ्या नागरिकांसह भाविकांनाही चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. देवस्थान परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निधी उपलब्ध असतानाही रस्त्याची अशी दयनीय अवस्था कायम राहणार असेल, तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. मुठवा बाबा चौबूतर्याजवळ साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या समस्येवर तत्काळ उपाययोजना न केल्यास काटकुंभ ग्रामपंचायतने सामूहिक राजीनामा द्यावा, अशी तीव्र मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande