मुंबईत तरुणाला धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडले; आरोपीला अटक
किरकोळ वादातून जीवघेणा प्रकार मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तौसिफ शेख याला सहप्रवाशाने लाथ मारल्याचे सम
Mumbai Youth kicked off moving local train  minor dispute endangers passenger's life


किरकोळ वादातून जीवघेणा प्रकार

मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील धावत्या लोकलमधून तरुणाला लाथ मारून खाली पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून झालेल्या वादातून २४ वर्षीय तौसिफ शेख याला सहप्रवाशाने लाथ मारल्याचे समोर आले आहे. या घटनेत तौसिफ गंभीर जखमी झाला असून रेल्वे पोलिसांनी राहुलकुमार पांडे (३०) याला अटक केली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या प्रकारात झाल्याने मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये ही घटना घडली. कांदिवली स्थानकातून राहुलकुमार पांडे लोकलमध्ये चढला होता. त्यावेळी तौसिफसोबत त्याचा वाद सुरू झाला. बोरिवली स्थानकाजवळ तौसिफने राहुलकुमारला लोकलच्या आत सरकण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर झटापटीत झाले.

लोकल बोरिवली स्थानकातून सुटल्यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढला. याचदरम्यान राहुलकुमार पांडे याने तौसिफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तौसिफ धावत्या लोकलमधून खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलिसांनी तातडीने तौसिफला उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तौसिफ नालासोपारा येथे राहत असून कारपेंटर म्हणून काम करतो.

दरम्यान, मुंबई लोकलमधील अशा हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. २० ऑगस्ट रोजी वांद्रे-माहीमदरम्यान धावत्या चर्चगेट-बोरिवली लोकलमधून बाहेर ढकलल्याने ६२ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला होता. राखीव डब्यातील जागेवरून हा वाद झाला होता. तसेच ८ ऑगस्ट रोजी सीटवरून झालेल्या वादात एका महिलेला हाताने आणि बेल्टने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोहम्मद रिझवान अन्सारी याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे लोकलमधील किरकोळ वाद हिंसक होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande