बंद घर फोडून ४५ ते ४६ तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास
जळगाव, 28 ऑगस्ट (हिं.स.) शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून अशात रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे
बंद घर फोडून ४५ ते ४६ तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड लंपास


जळगाव, 28 ऑगस्ट (हिं.स.) शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून अशात रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विश्वकर्मा नगरातील घरमालक उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास घराला लक्ष्य केले. रात्री अंदाजे १.३० ते २ वाजेच्या दरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून आतील दागिन्यांवर आणि रोखीवर डल्ला मारला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. तसेच चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान घराच्या पुढील व मागील परिसरातच घुटमळल्याने चोरट्याचा ठोस माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही.दरम्यान, पोलिसांनी घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजमध्ये एक संशयित चोरटा कैद झाल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावर मिळालेले ठसे तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande