जळगाव : हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव, 28 ऑगस्ट (हिं.स.)| यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपीला जळगावातून ताब्यात घेतले. विक
जळगाव : हवेत गोळीबार करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


जळगाव, 28 ऑगस्ट (हिं.स.)| यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत आरोपीला जळगावातून ताब्यात घेतले. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ८ वाजता डांभुर्णी गावातील चौकात विकास सोळंके याने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धारबळे यांच्यासह पोउनि मैनुद्दीन सय्यद, पोहेकॉ रोहिल गणेश, पोकॉ अनिल साळुंखे आणि पोकॉ हितेश बागुल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ नुकतेच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना आढळून आली.परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता विकास सोळंके यानेच तेथे गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करून रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोउनि अनिल महाजन आणि पोकॉ सचिन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे यांच्या पथकानेही शोधमोहीमेत सहभाग घेतला. पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध घेत रात्री सुमारे १ वाजता कालंका माता मंदिर परिसरातून विकास उर्फ गोटू सोळंके याला ताब्यात घेतले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande