दिवसभरातील चढ-उतारानंतर शेअर बाजार वाढीसह बंद
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। दिवसभरातील मोठ्या चढ-उतारानंतर अखेरच्या टप्प्यात झालेल्या जोरदार खरेदीच्या जोरावर देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३०.९२ अंकांनी म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी वाढून ७७ हजार
Stock Market Closing


नवी दिल्ली, 28 ऑगस्ट (हिं.स.)। दिवसभरातील मोठ्या चढ-उतारानंतर अखेरच्या टप्प्यात झालेल्या जोरदार खरेदीच्या जोरावर देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३३०.९२ अंकांनी म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी वाढून ७७ हजार २६४.५१ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८४.८० अंकांनी म्हणजेच ०.३५ टक्क्यांनी वाढून २४ हजार १७५.६५ अंकांवर स्थिरावला.

आजच्या व्यवहाराची सुरुवात बाजारासाठी सकारात्मक झाली. सेन्सेक्स १९४.४६ अंकांच्या वाढीसह ७७ हजार १२८.०५ अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या टप्प्यात खरेदीचा जोर कायम राहिल्याने सेन्सेक्सने ४२४.३८ अंकांची वाढ नोंदवत ७७ हजार ३५७.९७ अंकांची दिवसातील सर्वोच्च पातळी गाठली. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांकाची वाढ कमी झाली. दुपारच्या सुमारास सेन्सेक्स ७६ हजार ९८८.२२ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदीदार पुन्हा सक्रिय झाले आणि अखेरच्या अर्ध्या तासात झालेल्या खरेदीमुळे बाजाराने दमदार पुनरागमन केले.

निफ्टीची सुरुवातही ३१.७५ अंकांच्या वाढीसह २४ हजार १२२.६० अंकांवर झाली. सकाळच्या सत्रात निफ्टी २४ हजार १८८.३० अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्री वाढल्याने तो २४ हजार ७६.८५ अंकांपर्यंत घसरला. दुपारनंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीने नीचांकी पातळीवरून सुमारे १०० अंकांची सुधारणा केली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. त्यामुळे निफ्टीचा माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक ३.५१ टक्क्यांनी वाढला. धातू, प्रसारमाध्यमे आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. दुसरीकडे बँकिंग, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, दैनंदिन वापराच्या वस्तू, तेल-गॅस आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारानंतर बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४९२.८८ लाख कोटी रुपयांवर आले. गुरुवारी हे मूल्य ४९३.०५ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १७ हजार कोटी रुपयांची घट झाली. दिग्गज समभागांमध्ये टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि विप्रो हे आघाडीचे वाढणारे समभाग ठरले. तर आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट्समध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande