आयआयटी हैदराबाद येथे बँक ऑफ इंडियाच्या CyberShield Hackathon 2026 ची यशस्वी सांगता
* देशभरातून 2,936 स्पर्धकांचा सहभाग, 20 लाखांच्या बक्षीसांचे वितरण * निवड झालेल्या 72 स्पर्धकांनी आर्थिक क्षेत्रासमोरील सायबर सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाय सादर हैदराबाद, 28 ऑगस्ट (हिं.स.) - बँक ऑफ इंडियाने 26 आणि 27 ऑ
BoI-CyberShield-Hackathon-2026


* देशभरातून 2,936 स्पर्धकांचा सहभाग, 20 लाखांच्या बक्षीसांचे वितरण

* निवड झालेल्या 72 स्पर्धकांनी आर्थिक क्षेत्रासमोरील सायबर सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाय सादर

हैदराबाद, 28 ऑगस्ट (हिं.स.) - बँक ऑफ इंडियाने 26 आणि 27 ऑगस्ट 2026 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (IIT-H) येथे आयोजित केलल्या सायबरशिल्ड हॅकेथॉन 2026 (CyberShield Hackathon 2026) चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वतीने (PSB) सायबर सुरक्षा, फसवणूक आणि कृत्रिम तंत्राज्ञान हॅकेथॉन 2026 (Cybersecurity, Fraud & Artificial Intelligence Hackathon 2026) हा कार्यक्रम बँक ऑफ इंडियाने IIT Hyderabad च्या सहकार्याने आयोजित केला. हा उपक्रम भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग(DFS) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्या संयुक्त विद्यमाचा उपक्रम आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, शैक्षणिक संस्था आणि युवा नवकल्पक यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करणे आणि बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रासमोरील प्रत्यक्ष आव्हानांसाठी तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

2026 च्या आवृत्तीसाठी बँक ऑफ इंडिया आणि IIT-H यांनी सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत हॅकेथॉनच्या विविध टप्प्यांचे आयोजन करण्यासाठी IIT-H ने संस्थात्मक, तांत्रिक, लॉजिस्टिक आणि कार्यक्रमाशी संबंधित सहाय्य पुरवले.

बँकेने पुढील दोन समस्या-विधानांसाठी उपाय मागवले होते:

· समस्या-विधान १ : फसवणूक करणाऱ्या मोबाइल अॅप्लिकेशन्स (APKs) आणि मालवेअरचे स्वयंचलित रिव्हर्स इंजिनिअरिंग, स्टॅटिक आणि डायनॅमिक विश्लेषण तसेच जोखीम गुणांकन (रिस्क स्कोरिंग) करण्यासाठी Generative AI चा वापर.

· समस्या-विधान २ : आर्थिक व्यवहार, फसवणूकीवर पाळत आणि व्यवहारांवर बारिक नजर ठेवून वेळेवर इशारे, तसेच सरकारला सायबर-फसवणूकविषयी वेळेवर अर्लट किंवा आलेल्या तक्रारींचे विश्लेषण करून संशयास्पद व्यवहार आणि म्यूल खाती शोधण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजिन्स किंवा मशीन लर्निंगचा वापर करुन उपाय विकसित करणे, तसेच म्यूल खात्यांद्वारे फसवणूकीतून कमावलेल्या पैसेचा खुल्या बाजारात वापर रोखण्यास मदत करणे.

हॅकेथॉनला अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला, काही सांघिक तर काही वैयक्तिक अशा एकूण 2,936 स्पर्धकांनी हॅकेथॉनसाठी नोंदणी केली. IIT-H च्या मूल्यांकन समितीने छाननी आणि मूल्यांकन केल्यानंतर, प्रोटोटाइप सादरीकरणाच्या टप्प्यासाठी 72 स्पर्धकांची (प्रत्येक समस्या-विधानासाठी 36) निवड करण्यात आली. यामध्ये 68 संघिक आणि चार वैयक्तिक स्पर्धत अंतिम टप्प्यात आले. प्रातिनिधीक विचार केल्यास 232 या स्पर्धांनी या सायबरशिल्ड हॅकेथॉनच्या अंतिम टप्प्यात आपले सादरीकरण केले

27 ऑगस्ट रोजी ग्रँड फिनालेच्या पहिल्या दिवशी, निवड झालेल्या सहभागीांनी वरिष्ठ बँक अधिकारी आणि IIT-H च्या प्राध्यापकांचा समावेश असलेल्या मूल्यांकन समित्यांसमोर त्यांचे प्रोटोटाइप सादर केले.

मूल्यांकनाच्या आधारे, प्रत्येक समस्या-विधानांतर्गत नऊ अशा एकूण 18 अंतिम स्पर्धकांनी 28 ऑगस्ट रोजी अंतिम फेरीत प्रवेश केला. नवोन्मेष, तांत्रिक सुदृढता, स्पष्टीकरणक्षमता, विस्तारक्षमता, वापरकर्ता अनुभव आणि प्रोटोटाइप मूल्यांकन या निकषांवर या प्रवेशिकांचे मूल्यांकन करण्यात आले. प्रत्येक समस्या-विधानांतर्गत पहिल्या तीन उपायांचा समावेश असलेल्या सहा विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात आली.

CyberShield Hackathon 2026 चे विजेते

समस्या-विधान 1 : फसवणूक करणाऱ्या मोबाइल अॅप्लिकेशन्स (APKs) आणि मालवेअरचे स्वयंचलित रिव्हर्स इंजिनिअरिंग, स्टॅटिक आणि डायनॅमिक विश्लेषण तसेच जोखीम गुणांकन करण्यासाठी Generative AI चा वापर. या समस्या-विधानाचे विजेते:

· प्रथम पारितोषिक : टीम विजया — अरिस्मिता मुखर्जी, हर्ष मोहता, सार्थक माहेश्वरी आणि चंद्रहास रेड्डी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगळुरू

· द्वितीय पारितोषिक : टीम Fi — राहुल जलुथरिया, दानिश वर्मा, वरुण गुप्ता आणि अवनीत कौर, चंदीगड विद्यापीठ, चंदीगड

· तृतीय पारितोषिक : टीम लॉजिकफाउंड्री — मृणाली दीपक पाटील, प्राजिन सुदर्शन पाटील आणि सुजल जितेंद्र देशमुख, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा

समस्या-विधान 2

आर्थिक व्यवहार, फसवणूक-निगराणी उपायांचे इशारे, व्यवहार-निगराणी प्रणालीचे इशारे आणि सरकारी सायबर-फसवणूक इशारे/तिकिटे समाविष्ट करून संशयास्पद व्यवहार आणि म्यूल खाती शोधण्यासाठी AI/ML-आधारित उपाय विकसित करणे. या उपायाने म्यूल खात्यांद्वारे फसवणुकीतून मिळालेल्या रकमेचे अभिसरण रोखण्यासही मदत झाली पाहिजे. या समस्या-विधानाचे विजेते:

· प्रथम पारितोषिक : टीम we Are Winners — हर्षित गौतम, शुभी जैन, आरुषी चावला आणि अमर्त्य सिंह, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दिल्ली

· द्वितीय पारितोषिक : टीम विजया — अरिस्मिता मुखर्जी, हर्ष मोहता, सार्थक माहेश्वरी आणि चंद्रहास रेड्डी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगळुरू

· तृतीय पारितोषिक: टीम LUNA LUPA — संजित के. एस., के. एम. प्रध्युत, समात्मा भारद्वाज आणि साई किशन ए., पीईएस युनिव्हर्सिटी, बंगळुरू

या स्पर्धेसाठी एकूण ₹20.00 लाखांची पारितोषिके वितरित केली गेली. प्रत्येक समस्या-विधानासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना अनुक्रमे ₹5.00 लाख, ₹3.00 लाख आणि ₹2.00 लाख देण्यात आले. याव्यतिरिक्त, सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

समारोप समारंभाला रजनीश कर्नाटक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ इंडिया; डॉ. दीपक कुमार, संचालक, आयडीआरबीटी; प्रा. बी. एस. मूर्ती, संचालक, आयआयटी हैदराबाद; वेंकट राव, निबंधक, आयआयटी हैदराबाद; प्रा. शोभन बाबू, आयआयटी हैदराबाद; पी. हरि किशन, मुख्य महाव्यवस्थापक व मुख्य जोखीम अधिकारी, बँक ऑफ इंडिया; सत्येंद्र सिंह, मुख्य महाव्यवस्थापक व मुख्य माहिती अधिकारी, बँक ऑफ इंडिया; तसेच बँक ऑफ इंडिया, आयआयटी हैदराबाद, सी-डॅक आणि आयडीआरबीटीचे इतर वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. हॅकाथॉन मालिकेच्या अंतिम दिवशी मॅकिन्से आणि ईवायच्या टीमने सर्व मान्यवरांसमोर सादरीकरण केले.

रजनीश कर्नाटक, प्रबंध निदेशक एवं मुख्य कार्यपालक अधिकारी, बँक ऑफ इंडिया याप्रसंगी बोलताना म्हणाले, “डिजिटल फसवणुकीची वाढती गुंतागुंत पाहता बँकांनी आपली तांत्रिक क्षमता सातत्याने मजबूत करणे आणि व्यापक नवोन्मेष परिसंस्थेसोबत सहकार्य करणे आवश्यक आहे. CyberShield Hackathon 2026 ने गंभीर सायबरसुरक्षा आव्हानांसाठी व्यावहारिक उपाय विकसित करण्यासाठी प्रतिभावान तरुणांना एकत्र आणले आहे. यावर्षी मिळालेला मोठा प्रतिसाद भारतातील विद्यार्थी आणि नवोन्मेषकांमध्ये अधिक सुरक्षित आणि लवचिक डिजिटल बँकिंग परिसंस्था उभारण्यासाठी योगदान देण्याचा उत्साह दर्शवतो.”

डॉ. दीपक कुमार, संचालक, आयडीआरबीटी याप्रसंगी बोलताना म्हणाले, “भारताची डिजिटल वित्तीय परिसंस्था विस्तारत असताना सायबरसुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंधक क्षमता मजबूत करणे ही सर्वांसाठी समान प्राधान्याक्रमाची गोष्ट आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, शैक्षणिक संस्था आणि युवा नवोन्मेषक यांच्यातील सहकार्यामुळे नवनव्या जोखीमांसाठी व्यावहारिक आणि विस्तारक्षम उपायांचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. CyberShield Hackathon सारखे उपक्रम प्रत्यक्ष वित्तीय संस्था चालवताना येणारे अनुभव आणि तांत्रिक नवोन्मेष यांची सांगड घालून अधिक सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह बँकिंग परिसंस्था उभारण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात.”

प्रा. बी. एस. मूर्ती, संचालक, आयआयटी हैदराबाद यांच्या मते, “हॅकेथॉनसारख्या उपक्रमांमुळे शैक्षणिक नवोन्मेष आणि प्रत्यक्ष उद्योगाच्या गरजांमध्ये एक महत्त्वाचा दुवा निर्माण होतो. फसवणूकीच्या उद्देशाने तयार केलेली अॅप्लिकेशन्स, संशयास्पद व्यवहार आणि म्यूल खाती यांसारख्या गुंतागुंतीच्या आव्हानांवर विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी CyberShield Hackathon मुळे मिळाली. यातून त्यांना केवळ तांत्रिकदृष्ट्या नाविन्यपूर्णच नव्हे, तर व्यावहारिक, विस्तारक्षम आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन मिळते. अधिक सुरक्षित डिजिटल वित्तीय परिसंस्थेसाठी योगदान देऊ शकणाऱ्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.”

-------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande