प्रीमियर लीग: मँचेस्टर सिटीचा क्रिस्टल पॅलेसवर ४-१ ने दणदणीत विजय
लंडन, 29 ऑगस्ट (हिं.स.)अर्लिंग हालंड आणि रायन चेर्की यांनी प्रत्येकी दोन गोल करत मँचेस्टर सिटीला सेल्हर्स्ट पार्कवर क्रिस्टल पॅलेसविरुद्ध ४-१ असा विजय मिळवून दिला आणि प्रीमियर लीग मोहिमेतील त्यांची विजयी घोडदौड कायम राखली. हालंडने १७ व्या मिनिटाला
अर्लिंग हालंड


लंडन, 29 ऑगस्ट (हिं.स.)अर्लिंग हालंड आणि रायन चेर्की यांनी प्रत्येकी दोन गोल करत मँचेस्टर सिटीला सेल्हर्स्ट पार्कवर क्रिस्टल पॅलेसविरुद्ध ४-१ असा विजय मिळवून दिला आणि प्रीमियर लीग मोहिमेतील त्यांची विजयी घोडदौड कायम राखली. हालंडने १७ व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. त्याने ख्रिस रिचर्ड्सच्या वर झेप घेत अँटोनी सेमेन्योचा क्रॉस गोलकीपर डीन हेंडरसनच्या डोक्यावरून हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये धाडला.

सामन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिटीचे वर्चस्व राहिले. एलियट अँडरसन आणि हॅलँड यांनी गोलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर फिल फोडेनला मध्यंतरापूर्वी आघाडी वाढवण्याच्या दोन चांगल्या संधी साधता आल्या नाहीत. ५४ व्या मिनिटाला चेर्कीने दोन डिफेंडर्सना उत्कृष्टपणे चकवून आणि चेंडू गोलच्या डाव्या कोपऱ्यात मारून सिटीची आघाडी दुप्पट केली.त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत पॅलेसने एक गोल परत केला. येरेमी पिनोची फ्री-किक क्रॉसबारला आदळली आणि सिटीचा गोलकीपर जियानलुइगी डोनारुम्मा याला लागून चेंडू गोलपोस्टमध्ये गेला.

मात्र, सिटीने त्वरित प्रत्युत्तर दिले आणि तीन मिनिटांच्या आत चेर्कीने पुन्हा दोन गोलची आघाडी मिळवून दिली. फ्रान्सच्या या खेळाडूने बॉक्सच्या कडेला मोकळी जागा शोधली आणि त्याचा फटका दिशा बदलून हेंडरसनला चकवत गोलमध्ये गेला.८४ व्या मिनिटाला हॅलँडने आपला दुसरा गोल पूर्ण केला. फोडेनकडून मिळालेल्या अचूक पासवर त्याने 'निअर पोस्ट'च्या दिशेने जोरदार फटका मारला.

या निकालामुळे मँचेस्टर सिटीने सुरुवातीच्या दोन सामन्यांतून जास्तीत जास्त गुण मिळवत प्रीमियर लीग गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दुसरीकडे, क्रिस्टल पॅलेस २० व्या स्थानावर कायम आहे आणि नवीन व्यवस्थापक पियरे सेज यांना अजूनही त्यांच्या पहिल्या लीग गुणाची प्रतीक्षा आहे. सामन्याच्या अंतिम टप्प्यात सहज विजय मिळवताना सिटीने अयुब बौआद्दी आणि रायन मॅकआडू यांना प्रीमियर लीगमध्ये पदार्पणाची संधीही दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande