
नवी दिल्ली, २९ ऑगस्ट (हिं.स.) भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने घोट्याच्या दुखापतीमुळे चालू हंगामातील उर्वरित स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ तो पुढील आठवड्यात ब्रुसेल्समध्ये होणारी डायमंड लीग फायनल्स आणि सप्टेंबरमध्ये जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई खेळांना मुकणार आहे.
नीरजने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले की, लॉझान डायमंड लीगमध्ये हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर लगेचच सरावादरम्यान त्याच्या घोट्याच्या अस्थिबंधाला दुखापत झाली. त्याने डॉक्टर आणि संघाशी सल्लामसलत केल्यानंतर संपूर्ण हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
खूप मेहनतीनंतर, लॉझानमध्ये हंगामातील सर्वोत्तम भालाफेक करून मला हवा असलेला लय सापडला होता. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या घोट्याच्या अस्थिबंधाला दुखापत झाली. माझे डॉक्टर आणि संघाशी चर्चा केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी हंगामाच्या उर्वरित स्पर्धांमध्ये भाग घेणार नाही, असे नीरज म्हणाला.
नीरजची या हंगामातील शेवटची स्पर्धा लॉझान डायमंड लीग होती, जिथे त्याने ८८.०५ मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकले. त्यापूर्वी, त्याने दोहा डायमंड लीगमध्ये ८५.६९ मीटर थ्रो करून चौथे स्थान पटकावले होते.
डायमंड लीगच्या केवळ दोन स्पर्धांमध्ये भाग घेऊनही, नीरजने ब्रुसेल्स फायनल्ससाठी पात्रता मिळवली आणि हंगामातील सहावा सर्वोत्तम खेळाडू म्हणून अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता, दुखापतीमुळे तो या प्रतिष्ठित स्पर्धेतही सहभागी होऊ शकणार नाही. नीरजने जुलैमध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ८५.८३ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्य पदक जिंकले होते.
तो म्हणाला, हे निराशाजनक आहे, विशेषतः कारण मला वाटत होते की मी माझा फॉर्म परत मिळवण्याच्या जवळ होतो, पण म्हणतात ना, अडचणी या प्रवासाचाच एक भाग असतात. आता माझे लक्ष पूर्णपणे बरे होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परत येण्यावर आहे.
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता आणि माजी विश्वविजेता नीरजने मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.८८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत भारताने भालाफेकमध्ये ऐतिहासिक सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले, ज्यात किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले.
आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजच्या अनुपस्थितीत, रोहित यादव भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रोहितला पदक मिळवता आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे