झोपडीतून ऑलिम्पिकच्या स्वप्नापर्यंत; यवतमाळच्या तनुश्री कडूचा जिद्दीचा प्रवास
यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जीवनात कितीही संकटे आली तरी परिस्थितीसमोर हार मानायची नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर ऑलिम्पिकचे लक्ष्य गाठायचेच! असा दृढ आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तनुश्री उज्वला दिनेश कडू हिने व्यक्त केला
झोपडीतून आंतरराष्ट्रीय हॉकीत ‘तनुश्री’ची झेप... जिद्द, चिकाटीचे फलित; परिस्थितीवर मात करीत ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगले उराशी


यवतमाळ, 29 ऑगस्ट (हिं.स.)। जीवनात कितीही संकटे आली तरी परिस्थितीसमोर हार मानायची नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर ऑलिम्पिकचे लक्ष्य गाठायचेच! असा दृढ आत्मविश्वास आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तनुश्री उज्वला दिनेश कडू हिने व्यक्त केला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज संवाद साधताना तिने आपल्या संघर्षमय प्रवासाचा उलगडा केला.

यवतमाळलगतचे लोहारा हे हॉकीपटूंचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच मातीतल्या मालानीनगरातील एका छोट्याशा झोपडीतून तनुश्रीने आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू केला. वडील दिनेश कडू कपडे शिवून, तर आई उज्वला कडू घरातून काच-बटणाचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवितात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मुलीने खेळात मोठे यश मिळवावे, अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्यासाठी लागणार्!या खर्चाचा प्रश्न मात्र कायमच मोठा होता. तनुश्रीचे प्राथमिक शिक्षण लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवीत तिने यवतमाळच्या अभ्यंकर कन्या शाळेत प्रवेश घेतला. शाळेच्या मैदानावर हॉकी आणि खो-खो खेळणार्!या विद्यार्थिनी पाहून तिच्याही मनात हॉकी खेळण्याची इच्छा निर्माण झाली. शारीरिक शिक्षण शिक्षक अविनाश जोशी आणि संजय बट्टावार यांनी तिला प्रोत्साहन दिले. हॉकी प्रशिक्षक साहिद सय्यद यांनी तिच्यातील गुणवत्ता ओळखून तिला तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले.

खेळासाठी आवश्यक साहित्य, सुविधा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव असतानाही तनुश्रीने हार मानली नाही. १४ वर्षांखालील शालेय हॉकी स्पर्धेत राज्यस्तरावर खेळण्याची संधी तिला मिळाली. आपल्या कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र संघात तिची निवड झाली. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही तिने सामाजिक दायित्व पार पाडले. लोहारा परिसरातील आंतरराष्ट्रीय हॉकी गोलरक्षक आकाश चिकटे यांच्या यशाने तिच्या मनात मोठी ऊर्जा निर्माण केली. त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकविण्याचे स्वप्न तिने मनाशी पक्के केले. जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केल्यानंतर २०२२-२३ मध्ये तिची पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली.

भारतीय हॉकीतील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू अजित लाकरा यांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा तिला लाभ मिळाला. तसेच हॉकी मार्गदर्शक सागर करंडे आणि इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनामुळे तिच्या खेळाला अधिक धार आली. मिडफिल्डर म्हणून खेळताना आक्रमणाबरोबरच क्षणात बचावासाठी परतण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले. महाराष्ट्र हॉकी संघाकडून तब्बल सहा वेळा राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत तिने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. साईचे प्रशिक्षक प्रमोद शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अजिंक्यपद स्तरावरही तिने आपली छाप पाडली.

तनुश्री कडू हीने सांगितले की, भविष्यात प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी होऊन क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काम करण्याचे तिचे स्वप्न आहे. माझ्या आई-वडिलांनी परिस्थितीशी संघर्ष करून मला घडविले. प्रशिक्षकांनी खेळ शिकविला. त्यामुळे त्यांच्या कष्टांचे पांग फेडण्यासाठी आयुष्यातील लक्ष्य गाठायचे आहे. क्रीडा क्षेत्र आणि समाजासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा माझा निर्धार आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande