नीट-पीजी परीक्षा कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत देशभरात यशस्वीरित्या संपन्न
सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 339 शहरांमधील 1,111 केंद्रांवर 2.73 लाख उमेदवारांसाठी परीक्षा करण्यात आली आयोजित; 2.65 लाखांहून अधिक उमेदवार उपस्थित जयपूरमधील दोन केंद्रांवर तांत्रिक अडथळ्यामुळे परीक्षा देता न आलेल्या 2,445 उमेदवारांची पुनर
NEET-PG 2026 Exam Successfully Conducted Nationwide


सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 339 शहरांमधील 1,111 केंद्रांवर 2.73 लाख उमेदवारांसाठी परीक्षा करण्यात आली आयोजित; 2.65 लाखांहून अधिक उमेदवार उपस्थित

जयपूरमधील दोन केंद्रांवर तांत्रिक अडथळ्यामुळे परीक्षा देता न आलेल्या 2,445 उमेदवारांची पुनर्परीक्षा 5 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात येणार

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हिं.स.)। नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने 30 ऑगस्ट 2026 रोजी, कडक सुरक्षा, तांत्रिक सुविधा, मालवाहतूक व्यवस्थापन आणि पुरेशा मनुष्यबळाच्या व्यवस्थेसह देशभरात नीट-पीजी 2026 परीक्षा यशस्वीरीत्या घेतली. परीक्षेची प्रक्रिया नि:पक्ष, सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 339 शहरांमधील 1,111 परीक्षा केंद्रांवर 2,73,096 उमेदवारांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला एकूण 2,65,980 उमेदवार उपस्थित राहिले. यापैकी सुमारे 2,63,535 उमेदवारांसाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली.

देशभरातील परीक्षेवर प्रत्यक्ष थेट देखरेख आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनावर देखरेख ठेवण्यासाठी एकूण 2,527 प्राध्यापकांची स्वतंत्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याव्यतिरिक्त, अधिष्ठाते, संचालक, वैद्यकीय अधीक्षक आणि वरिष्ठ प्राध्यापकांसह 700 हून अधिक जण भरारी पथकांचे सदस्य म्हणून तैनात करण्यात आले होते.

समन्वय आणि देखरेख अधिक प्रभावी करण्यासाठी देशभरात एनबीईएमएसची 16 प्रादेशिक नियंत्रण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर थेट सीसीटीव्हीची देखरेख ठेवण्यात आली होती. द्वारका येथील एनबीईएमएसच्या मुख्यालयातील कमांड सेंटरमधून या देखरेखीवर सतत लक्ष ठेवले जात होते. थेट तात्काळ देखरेखीसाठी एनबीईएमएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या 190 कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते.

एनबीईएमएसच्या मुख्यालयातील विशेष नियंत्रण केंद्रातून एनबीईएमएस, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआयएल) आणि टीसीएसच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. परीक्षेची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि तोतयेगिरी रोखण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून, परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचे आधार-आधारित प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पार पडले. सरकारी संस्थांनी परीक्षेच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी पूर्ण सहकार्य केले.

देशभरातील बहुतांश उमेदवारांसाठी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली असली तरी, iON डिजिटल झोन iDZ सीतापुरा केंद्र, जयपूर, राजस्थान (टीसी क्र. 41682 आणि 41683) येथे एक अनपेक्षित तांत्रिक अडथळा निर्माण झाला. तिथे परीक्षा घेणाऱ्या टीसीएस लिमिटेड या संस्थेच्या परीक्षा केंद्रांमधील अंतर्गत वीज पुरवठ्यातील समस्यांमुळे 2,445 उमेदवारांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. उमेदवारांची अशाप्रकारे परीक्षेदरम्यान गैरसोय झाल्या बद्दल एनबीईएमएसने तीव्र खेद व्यक्त केला आहे. या उमेदवारांना इतरांप्रमाणेच नीट-पीजी 2026 परीक्षा पुन्हा एकदा आणि निःपक्षपणे देता यावी, यासाठी एनबीईएमएसने तातडीने आवश्यक पावले उचलली आहेत.

त्यानुसार, या तांत्रिक अडथळ्या मुळे परीक्षा देता न आलेल्या सर्व उमेदवारांची पुनर्परीक्षा शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता जयपूर, राजस्थान येथे घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि इतर आवश्यक सूचना संबंधित उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येतील. 339 शहरांमधील 1,111 केंद्रांवर परीक्षा यशस्वीरित्या पार पडणे हे परीक्षा प्राधिकरण, वैद्यकीय संस्था, प्राध्यापक, सुरक्षा यंत्रणा, तंत्रज्ञान पथके आणि या देशव्यापी परीक्षेशी संबंधित इतर सर्व घटकांमधील प्रभावी समन्वयाचे निदर्शक आहे.

एनबीईएमएसने उमेदवारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल, दाखवलेल्या संयमाबद्दल आणि विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच,नीट-पीजी 2026 परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि संस्थांच्या समर्पित कार्याचेही कौतुक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande