
पुणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) आपला उमेदवार जाहीर केला आहे. संघटनेने कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.रविवार, २३ ऑगस्ट रोजी पर्वती पायथा येथील रावसाहेब पटवर्धन हायस्कूलमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये कौस्तुभ गावडे (कोल्हापूर), नीळकंठ लिंगे (सोलापूर), सचिन सानप (पुणे) आणि एन. एस. पाटील (सांगली) यांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर टीडीएफच्या निवड समितीने गावडे यांच्या नावाची उमेदवारीसाठी निवड केली पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.या पत्रकार परिषदेला टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात, राज्य कार्यवाह के. एस. ढोमसे, कार्याध्यक्ष नरसू पाटील, पुणे विभाग अध्यक्ष शिवाजी कामथे, पुणे विभाग माध्यमिकचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, पुणे विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रा. संतोष थोरात यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य, निवड समितीचे सदस्य आणि टीडीएफचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत टीडीएफने उमेदवार निश्चित केल्याने आगामी निवडणुकीतील राजकीय आणि शिक्षक संघटनांमधील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु