शेतकर्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढा : खासदार संजय जाधव
परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाड्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी (दि.30) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परभणीत आयोजित केलेल्या श
Q


परभणी, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

मराठवाड्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी (दि.30) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परभणीत आयोजित केलेल्या शेतकरी व युवक संवाद मेळाव्यातून केली.

शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या या शेतकरी व युवक संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी हजेरी लावली. यावेळी आपल्या प्रास्ताविकातून खासदार जाधव यांनी मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, असे नमूद करीत परभणीसह मराठवाड्यात पुरेसा पाऊस नाही. काही भागात दुबार पेरणी झाली आहे. तरीही पावसाचा थांगपत्ता नाही, पाऊस नियमितपणे पडत नाही. त्यामुळे सातत्याने मराठवाड्यातील शेतकर्यांसमोर संकटे उभी राहत आहेत. शेतकरी सर्वार्थाने संकटात सापडला आहे. या आपदग्रस्त शेतकर्यांना सरकारद्वारे मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. खर्चसुध्दा निघत नाही. त्यामुळे जगावं की मरावं हे सुध्दा कळत नाही, आपण जाणते नेते आहात, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्यांच्या या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशीही मागणी केली.

मराठवाड्यात नियमित पाऊस का पडत नाही, या विषयी शास्त्रज्ञांद्वारे संशोधन झाले पाहिजे, त्या मागील कारणे समोर आली पाहिजेत, असे नमूद करीत खासदार जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील सर्वांगिण विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातील 62 गावे जायकवाडीच्या पाण्यापासून वंचित आहेत, लाभक्षेत्रांतर्गत या गावांना जायकवाडीचं पाणी पोहोचलं पाहिजे, तसेच परभणीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणार्या नवीन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. क्रिडा संकुलाला कृषि विद्यापीठाची जमीन तात्काळ उपलब्ध झाली पाहिजे, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यानेच शिवसेनेस राजमान्यता मिळवून दिली आहे. आजतागायत येथून शिवसेनेचाच खासदार निवडून आला आहे. भविष्यातसुध्दा हा जिल्हा शिवसेनेच्या व आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल, अशीही ग्वाही दिली.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande