
रायगड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच चौक-कर्जत मार्गावरील स्थानिकांच्या हातगाड्या, टपऱ्या आणि छोट्या व्यावसायिक आस्थापनांवर प्रशासनाने जेसीबी चालविल्याने स्थानिक व्यावसायिक आणि तरुणांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे याच व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अतिक्रमण हटावाच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
चौक आणि वावरे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील चौक-कर्जत रस्त्यावर अनेक स्थानिक युवक हातगाड्या आणि छोट्या टपऱ्यांमधून व्यवसाय करीत होते. या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता. अतिक्रमण हटविण्याबाबत तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर व्यावसायिकांनी आमदार महेश बालदी तसेच मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांची भेट घेऊन कारवाईला पर्याय शोधण्याची मागणी केली होती. तहसील कार्यालयातही यासंदर्भात बैठक झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आमदार महेश बालदी आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या भ्रमणध्वनीवरील संदेशानंतर यापूर्वी अतिक्रमण हटावाची कारवाई थांबविण्यात आली होती, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. गणेशोत्सव जवळ असल्याने तसेच पावसाळा सुरू असल्यामुळे कारवाई पुढे ढकलली जाईल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिकांना होती. मात्र अचानक जेसीबी दाखल झाल्याने त्यांचा आक्रोश सुरू झाला.
उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच शासनाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र कारवाईपूर्वी योग्य आणि पुरेसा वेळ देण्यात आला नसल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिकांनी केला. आम्हाला वेळ दिला असता तर अतिक्रमणे स्वतःहून हटविली असती, असे त्यांनी सांगितले.
या कारवाईमुळे रस्त्यालगतच्या मोठ्या बांधकामांचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. छोट्या टपऱ्या आणि हातगाड्यांवर तातडीने कारवाई होत असताना मोठ्या आणि धनाढ्य व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही प्रशासनाचा हातोडा चालणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. रस्त्याच्या काही भागात साईडपट्टी नसणे, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारे नसणे आणि पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, कारवाईसाठी अलिबागहून मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी सानप, तलाठी तसेच पोलीस यंत्रणेच्या उपस्थितीत दोन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईनंतर चौक-कर्जत मार्गावरील अतिक्रमण हटावापेक्षा प्रशासनाच्या कारवाईतील समानता आणि स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)