चंद्रपूर जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २.७० लाख ‘अनकाऊंटेबल’ मतदारांची पडताळणी
चंद्रपूर, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी वसूम
चंद्रपूर जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; २.७० लाख ‘अनकाऊंटेबल’ मतदारांची पडताळणी


चंद्रपूर, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला.

बैठकीत मतदान केंद्रांचे अंतिम सुसूत्रीकरण, मतदारांची आकडेवारी, विविध अर्जांसाठी आवश्यक असलेली भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली १२ कागदपत्रे, संबंधित कायदेशीर कलमे, नोटीस कालावधी तसेच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (BLA) भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली.मागील SIR मधील मतदाराच्या अथवा त्याच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या तपशिलाशी जुळवणी न झाल्यास तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी आयोगाने निश्चित केलेल्या १२ कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

मान्य कागदपत्रांमध्ये—

जन्माचा दाखला

पासपोर्ट

इयत्ता दहावीचे (मॅट्रिक) किंवा अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी/निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र

राज्य किंवा स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही

शासनाने दिलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र

वन हक्क प्रमाणपत्र

राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा

शासन, स्थानिक प्राधिकरण, बँक, टपाल कार्यालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ किंवा सार्वजनिक उपक्रमाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र/प्रमाणपत्र

आधार कार्ड — ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार

नमुना ६ : नवीन मतदार नोंदणी सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले नागरिक तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार नमुना क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवू शकतात.

नमुना ७ : नाव वगळणे किंवा हरकत

मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नोंद असलेल्या मतदाराचे नाव वगळण्यासाठी संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार नमुना क्रमांक ७ भरून हरकत नोंदवू शकतो.

नमुना ८ : दुरुस्ती व स्थलांतर

मतदार यादीतील स्वतःच्या नोंदीमध्ये नाव, वय, नातेसंबंध किंवा छायाचित्रातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.

एकाच ठिकाणी मतदार नोंदणी

बंधनकारक

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम १७ आणि १८ नुसार एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदविता येत नाही. त्यामुळे सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच गणना अर्ज भरणे बंधनकारक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना खोटी घोषणा किंवा चुकीचे विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

२ लाख ७० हजार १५३ ‘अनकाऊंटेबल’मतदारांची पडताळणी

सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) माध्यमातून प्रारूप मतदार यादी तसेच २ लाख ७० हजार १५३ ‘अनकाऊंटेबल’ मतदारांच्या यादीची सखोल पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही मदतीसाठी १९५० या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच ECINET ऍप किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्यासह अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, तहसीलदार विजय पवार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande