
चंद्रपूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘आदर, खेळ आणि हालचाल’ या संकल्पनेवर आधारित ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या थीमअंतर्गत जिल्हाभर विविध क्रीडा स्पर्धा, तंदुरुस्तीविषयक उपक्रम, जनजागृती रॅली, पारंपरिक खेळ आणि खेळाडूंच्या गौरवाचे कार्यक्रम घेण्यात आले.
क्रीडा ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे, हा संदेश या तीन दिवसीय उपक्रमातून देण्यात आला. 28 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करून उपक्रमांची सुरुवात झाली.
100 मीटर दौड अन् शहरातून भव्य जनजागृती रॅली-
29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ घेण्यात आली. पोलीस विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात मुला-मुलींसाठी 100 मीटर दौड स्पर्धा घेण्यात आली. यावेळी छत्रपती पुरस्कारार्थी कुंदन नायडू, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, प्रशिक्षक प्रवीण राठोड, नीलकंठ चौधरी आदी उपस्थित होते.
यानंतर खेळाडूंची भव्य जनजागृती रॅली चंद्रपूर शहरातून काढण्यात आली. सहभागी मुला-मुलींना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. सायंकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमाला छत्रपती पुरस्कारार्थी राजेश नायडू, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताख, जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. पूजा देऊरकर, तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके व विठ्ठल भालेराव, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, व्हॉलीबॉल प्रशिक्षक हेमंत गिवे, तायक्वांदो प्रशिक्षक बजरंग वानखेडे, जिल्हा क्रीडा समन्वयक वाल्मीक खोब्रागडे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव