रत्नागिरी : बालगोपाळांनी घडविले शाडू मातीपासून गणपती
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी उपनगराध्यक्षा रूपाली राकेश दांडेकर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळे
रत्नागिरी : बालगोपाळांनी घडविले शाडू मातीपासून गणपती


रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । :

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी उपनगराध्यक्षा रूपाली राकेश दांडेकर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत ५ ते १५ वर्षे वयोगटातील ८० हून अधिक बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हातांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारली.

पेठमाप येथील श्री स्वकुळ साळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत स्वरदा येथील राज आर्ट्सचे तज्ज्ञ राज पालकर यांनी मुलांना गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. गणेशमूर्ती साकारण्याच्या विविध टप्प्यांचे प्रात्यक्षिक करून त्यांनी बालगोपाळांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी नैसर्गिक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये कला, सर्जनशीलता आणि संस्कृतीची आवड निर्माण करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष सिद्धेश जाधव, सचिव मृणाल करंजकर यांच्यासह आकांक्षा गुरव, दीक्षा देवळेकर, अभिषेक कदम, श्रावणी कोतरे तसेच क्लबचे इतर पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande