
आगामी ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन
नाशिक, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे व हरकती असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
आगामी १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.
एएसडीडी मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या एएसडीडी मतदारांची यादी, तसेच त्यामध्ये नाव समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणे संबंधित मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालये, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये तसेच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना या कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरता येणार आहे. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर संबंधित मतदारसंघातील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत दाखल करता येणार आहे. संबंधित अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत.
चुकीची माहिती दिल्यास कारवाई
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदीमध्ये दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात, असा इशाराही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिला.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील अथवा अन्य तपशीलातील दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा चुकीच्या नोंदींबाबत हरकत नोंदविता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः प्रथमच मतदान करणारे युवक-युवती, स्थलांतरित मतदार तसेच मतदार यादीतील तपशीलात बदल झालेल्या नागरिकांनी यादीची पडताळणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
एसआयआर प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मतदार यादीतील नोंदींची तपासणी करताना आढळणाऱ्या त्रुटी, विसंगती अथवा हरकतींबाबत संबंधितांना योग्य संधी देण्यात येणार आहे.
SIR प्रक्रियेंतर्गत मोठ्या प्रमाणावर गणनापत्रकांचे वितरण करण्यात आले असून, BLO पासून पुढील स्तरापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.
मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी यावेळी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विसंगती, ओळखविषयक माहिती, वयातील तफावत तसेच समान छायाचित्रांच्या नोंदींची तपासणी केली जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ गणनापत्रक भरून घेण्यापुरती मर्यादित नसून, प्राप्त माहितीची तांत्रिक पद्धतीनेही पडताळणी केली जात असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेणार
राष्ट्रीय पक्षांच्या बैठका घेऊन मतदार यादीच्या तपासणी प्रक्रियेत त्यांच्या जिल्हा, महिला, युवा तसेच अन्य घटकांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरापासून मतदारसंघस्तरापर्यंतच्या बैठकांमध्ये संबंधित प्रतिनिधींनी सहभागी होऊन प्रक्रिया समजून घ्यावी आणि आवश्यक हरकती अथवा सूचना प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना नोटीस बजावण्याची आवश्यकता असेल, त्यांना नियमानुसार नोटीस देण्यात येईल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडावी. कागदपत्रे आणि नोंदींची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अनियमित पद्धतीने नोंदी वगळल्या जाणार नाहीत
कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर किंवा अनियमित पद्धतीने मतदारांच्या नोंदी वगळण्याची प्रक्रिया सुरू नसून, प्रत्येक प्रकरणाची नियमानुसार तपासणी केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गाव, प्रभाग आणि मतदान केंद्राच्या स्तरावर प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI