परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.): गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरिप पिके पूर्णतः धोक्यात आली आहेत. या एक-दोन दिवसात पाऊस न पडल्यास खरिप पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाईल, दुबार पेरणीसुध्दा अशक्य होईल, असे विदार
संपूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिके पूर्णतः धोक्यात : परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर :  दुबार पेरणीसुध्दा अशक्य


परभणी, 31 ऑगस्ट (हिं.स.): गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरिप पिके पूर्णतः धोक्यात आली आहेत. या एक-दोन दिवसात पाऊस न पडल्यास खरिप पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाईल, दुबार पेरणीसुध्दा अशक्य होईल, असे विदारक चित्र उद्भवले आहे. त्याचा परिणाम या जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः चिंतातूर झाला आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यात या वर्षी बर्यापैकी पाऊस झाला. परंतु, परभणी जिल्ह्यात यावर्षी पुरेसा असा पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम खरिप पिकांच्या पेरण्या रखडल्या, लांबल्या. अखेर मोठा पाऊस होईल या अपेक्षेपोटी हलक्या ते मध्यम पावसावरच शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या कसबशा आटोपल्या. दुर्देवाने या पेरण्यानंतरसुध्दा या जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालाच नाही. जूलै महिन्यात जो काही पाऊस झाला, तो हलका ते मध्यम स्वरुपाचाच. त्या पावसावरच खरिपाची पिके उगवली अन् तगली. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. ते महिना संपेपर्यंतसुध्दा पावसाचा थांगपत्ताच नाही. त्याचा परिणाम असा, खरिप पिके पूर्णतः सुकू लागली आहे. धोक्यात आली आहे.

या जिल्ह्यात या वर्षीही सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. शेतकर्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. परंतु, सोयाबीनची स्थिती गंभीर आहे. वाट्या लागल्या खर्या परंतु, उन्हामुळे वाट्या गळाला लागल्या आहेत. उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. हलक्या जमीनीवरील पिक पिवळी पडली असून या एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास पिके पूर्णतः नष्ट होतील, असे गंभीर चित्र आहे. कापसाची अवस्था सुध्दा दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ठिकठिकाणी कमरेएवढी वाढलेल्या कापसाची पाने गळत आहेत. फळ लागेनासे झाले आहे. तर मूगालाही शेंगा लागल्या नाहीत. काही ठिकाणी शेंगा लागल्या खर्या परंतु, त्या भरल्या नाहीत, शेंगा बारीक आहेत, परिपक्त नाहीत. उडीद, तूर व अन्य पिकांचीसुध्दा अवस्था बिकट आहे. या जिल्ह्यात काही भागात या वर्षी हळदीचीही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली.

हळदीस गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या भावामुळे शेतकर्यांनी मोठ्या उमेदीने हळद घेतली. परंतु, पावसाअभावी हळदीच्या रोपांची पुरेशी वाढ नाही. या जिल्ह्यात हे चित्र सर्वदूर, सर्वसाधारणपणे सारखेच आहे. विशेषतः हलक्या जमीनीवरील खरिप पिके अक्षरशः धोक्यात आहेत. या दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास या ठिकाणी दुबार पेरणी करणंसुध्दा अशक्य आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी हवालदिल झाला आहे. सणा सुदीच्या या काळात ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले असून दररोज वातावरणात मोठ्या प्रमाणावर गर्मी, उकाडा जाणवत असतांनासुध्दा पावसाचा थांगपत्ता नाही. गेल्या आठ-पंधरा दिवसात थेंबभरसुध्दा पाऊस झाला नाही. त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी हतबल आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येसुध्दा त्याचे साद पडसाद या सणासुदीच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande