
बीड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
ना महागडे स्पोर्टस शूज, ना ट्रॅकसूट, ना कसला प्रशिक्षक.. हातात होती ती फक्त रोजच्या कष्टाची ताकद आणि मनात दोन मुलींच्या भविष्याची चिंता। याच जिद्दीच्या जोरावर अंबाजोगाईत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत स्वयंपाकाचे काम करणाऱ्या रमाबाई रणवीर (वय ४७) यांनी चक्क साडी नेसून, स्लीपर हातात धरून अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक पटकावत ३ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.
तरुर्णीना मागे टाकत त्यांनी मिळवलेल्या या सुवर्णविजयाने उपस्थितांचे डोळे पाणावले, तर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानबाबा चौक दरम्यान 'अमृत दौड' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis