
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात अमली पदार्थमुक्त रत्नागिरीसाठी नागरिकांना मार्गदर्शन करून नशामुक्त समाजाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांची देशातील उत्कृष्ट पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रत्नागिरी जिल्हा ‘ड्रग्स फ्री’ करण्याचा निर्धार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी