
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । आजच्या डिजिटल युगात मोबाइईल आणि इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले असले तरी त्यांचा योग्य आणि सुरक्षित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या अनावश्यक वापरापासून दूर राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले.
लांजा शहरातील अल-अमिन उर्दू हायस्कूल येथे रत्नागिरी पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, सजगता आणि स्वसंरक्षण अभियान रायझिंग फ्लॉवर्स अंतर्गत लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक बगळे बोलत होते.
ते म्हणाले, उभरत्या वयातच जीवनाचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्यास उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया तयार होईल. इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील व्यक्ती आणि माहितीशी जोडले जाणे सहज शक्य झाले आहे. मात्र, या सुविधेचा वापर करताना वैयक्तिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये. सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवताना विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अन्यथा आर्थिक फसवणुकीसह विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्याचे उपाय, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्रीचे धोके, ऑनलाइन ग्रुमिंग, मोबाइल व इंटरनेटचा सुरक्षित वापर, वाहतूक नियम, प्रवासातील सुरक्षितता तसेच आत्मसंरक्षण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास अल-अमिन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. ए. सय्यद यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी