महामार्गावरती दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना अटक, पाच फरार - पोलीस अधीक्षक स्वामी
सिन्नर, 31 ऑगस्ट (हिं.स.)। - समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोल
महामार्गावरती दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना अटक, पाच फरार - पोलीस अधीक्षक स्वामी


सिन्नर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

- समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, इतर ५ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी दिली आहे

या बाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर जवळील मलढोण आणि दुशिंगपूर दरम्यान दरोडेखोरांनी रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून धावत्या वाहनांचे टायर फोडले होते. यावेळी गाडी थांबताच छत्रपती संभाजीनगर येथील एका वकिलाच्या कुटुंबासह दोन वाहनांतील प्रवाशांना मारहाण केली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला होता. या थरारक घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वात तपासासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, वैद्यकीय दुकाने, हॉटेल्स आणि ग्रामपंचायतींच्या माहितीच्या आधारे तपासाचा धागा पकडला. दरोडेखोरांनी घटनास्थळापासून ५ किलोमीटर अंतरावर आपली वाहने उभी केली होती. यानंतर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा या गावांमध्ये थेट कोंबिंग ऑपरेशन राबवून ७ जणांना ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी

दरम्यान, अटक करण्यात आलेले सर्व दरोडेखोर हे धाराशिव जिल्ह्यातील असून अर्जुन पवार, अशोक शिंदे (मुख्य सूत्रधार), लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार अशी त्यांची नावे आहेत.

ही अत्यंत गंभीर घटना होती. पोलिसांनी तात्काळ १० पथके तयार करून तांत्रिक व इतर तपासाच्या जोरावर अवघ्या ४८ तासांत ७ आरोपींना अटक केली. प्रकरणात एकूण १२ आरोपींचा समावेश असून उर्वरित ५ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. महामार्गावर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande