
सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाला यश; प्रशासनाकडून कारवाई
मालेगाव, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
मनपा उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो अखेर हटविण्यात आला. नगरसचिव सज्जाद अन्सारी यांनी फोटो हटविल्याचे पत्र दिल्यानंतर सकल हिंदू समाजातर्फे सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले. हे सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाचे यश असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्याम देवरे यांनी बोलताना सांगितले.
सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी सकाळी श्याम देवरे व महेश सरक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व गोमूत्र घेऊन उपमहापौरांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले. टिपू सुलतानचा फोटो हटवून दालन गोमूत्राने शुद्ध करावे, तसेच उपमहापौरांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट द्यावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी उपमहापौरांच्या दालनाला कुलूप होते.दरम्यान, समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही महापालिकेत दाखल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. किल्ला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाद टाळण्यासाठी उपमहापौर शानेहिंद यांनी दुसऱ्या दालनातून कामकाज सुरू ठेवले. प्रशासनाने फोटो हटविण्याचे पत्र दिल्यास फोटो काढण्यात येईल, मात्र त्यानंतर संविधानिक पद्धतीने आपली लढाई सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली.दुपारी नगरसचिव सज्जाद अन्सारी यांनी श्याम देवरे यांना फोटो हटविल्याचे पत्र दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे महापालिकेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.यापूर्वी शिवसेना मनपा विरोधी पक्षनेते निलेश काकडे यांनी फोटो हटवावा, अन्यथा दालनाचे कुलूप तोडून फोटो काढू, असा इशारा देत ठिय्या आंदोलन केले होते. भाजपनेही अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना निवेदन देऊन फोटो हटविण्याची मागणी केली होती. सलगच्या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने अखेर फोटो हटविला. आता समाजवादी पक्ष व उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांची पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI