

त्र्यंबकेश्वर , 31 ऑगस्ट (हिं.स.)तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीत रविवार व तिसरा श्रावणी सोमवारी (दि.३१) मिळून दोन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. ‘बम बम भोलेच्या जयघोषाने त्र्यंबकेश्वर दुमदुमून गेले. शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कुंभमेळ्याच्या धर्तीवर नियोजन केले असून, पोलीस व नगरपालिका यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दोन दिवसांत सुमारे ४५ हजार भाविकांनी सहभाग घेतला. रविवारी सायंकाळपासूनच भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. देवदर्शन, स्नान व विश्रांतीनंतर मध्यरात्री आणि पहाटे भाविक प्रदक्षिणा मार्गाकडे रवाना होत होते. शहरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळावरून सुंदराबाई मठ, कुशावर्त तीर्थ आणि तेथून त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले होते. मंदिराच्या पूर्व दरवाजाकडे जाण्यासाठी स्मशानभूमी रोडचा वापर करण्याची व्यवस्था होती. सोमवारी पेड दर्शन रांग बंद ठेवण्यात आली होती.वरिष्ठ पोलीस अधिकारी त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून होते, तर नगरपालिका अधिकारीही नियोजनासाठी उपस्थित होते. प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली.
दरम्यान, या व्यापक नियोजनामुळे स्थानिक नागरिकांना मात्र त्रासाचा अनुभव आला. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी साडेतीन ते चार लाख भाविक येत असतानाही एवढ्या मोठ्या नियोजनाची गरज भासत नाही; कुंभमेळ्याच्या धर्तीवरील नियोजनामुळे यंदा गर्दी अधिक जाणवत असल्याचा दावा काही नागरिकांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI