अमेरिका-इराण संघर्ष वाढला; युएईकडून इराणचा एक ड्रोन पाडल्याचा दावा
अबू धाबी , 31 ऑगस्ट (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई दलाने सोमवारी आपल्या सागरी हद्दीत आलेल्या एका इराणी ड्रोनला पाडले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेने इराणच्या लारक बेटावर केलेल्या लष्करी हल्ल्
अमेरिका-इराण संघर्ष वाढला; युएईकडून इराणचा एक ड्रोन पाडल्याचा दावा


अबू धाबी , 31 ऑगस्ट (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई दलाने सोमवारी आपल्या सागरी हद्दीत आलेल्या एका इराणी ड्रोनला पाडले. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेने इराणच्या लारक बेटावर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेल्या कारवाईनंतर ही घटना घडली आहे. गेल्या महिनाभरातील दोन्ही देशांमधील ही पहिली मोठी लष्करी कारवाई होती.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, इराणच्या दिशेने येणारा एक ड्रोन यूएईच्या सागरी हद्दीत आढळून आला आणि तो नष्ट करण्यात आला. इराणने तत्काळ या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच या घटनेत कोणतेही नुकसान झाल्याची माहितीही समोर आलेली नाही. यानंतर यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने आणखी एक निवेदन जारी करून इराणी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचे खंडन केले. या वृत्तात दुबईतील अल मेनहाद हवाई तळाला इराणी क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला होता.

रविवारी अमेरिकन सैन्याने इराणच्या एका बेटावर रॉकेट प्रक्षेपकांना लक्ष्य केल्यानंतर ही घटना घडली. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धात काही काळापासून निर्माण झालेली शांतता या कारवाईमुळे पुन्हा भंगली. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. मात्र, ही क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली.इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी पहाटे सांगितले की, इराण आपल्या कायदेशीर स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर करण्यापासून मागे हटणार नाही आणि कोणत्याही लष्करी आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देईल.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्यासोबत किर्गिस्तानला रवाना होण्यापूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी इराणला युद्ध नको असल्याचे सांगितले. संघर्षाचा तोडगा चर्चेच्या माध्यमातून काढण्याच्या बाजूने इराण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र, “आम्ही आक्रमण करणाऱ्यांना निर्णायक प्रत्युत्तर देऊ,” असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कॅरोलिनामध्ये जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करणार होते. इराणला आर्थिकदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी इतर देशांनी अमेरिकेला मदत करावी, यासाठी अमेरिका दबाव वाढवत असताना ही बैठक होत आहे. इराणच्या नेत्यांकडून युद्ध समाप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवलती मिळवणे, हा या दबावामागील उद्देश आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेचे लक्ष इराणवरील आर्थिक दबाव वाढवण्यावर होते. मात्र, रविवारी अमेरिकी सेंट्रल कमांडने इराणच्या रॉकेट प्रक्षेपकांना लक्ष्य केल्याची माहिती दिली.अमेरिकी सैन्याच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या जवानांना होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये समुद्री सुरुंगांनी सज्ज रॉकेट डागण्याची तयारी करताना पाहण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

इराणच्या अर्ध-सरकारी वृत्तमाध्यमांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील लारक बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त दिले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने या घटनेत काही जण जखमी किंवा मृत झाल्याचा दावा केला.अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकी हल्ले आक्रमक स्वरूपाचे असल्याचा इराणचा दावा फेटाळून लावला. ही कारवाई मर्यादित आणि अचूक स्वरूपाची होती, असे त्यांनी सांगितले. समुद्रात सुरुंग पेरण्याची तयारी करणाऱ्या दलांना लक्ष्य करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर अमेरिकी लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचे दृश्य प्रसारित करण्यात आले. जॉर्डनच्या लष्कराने आपल्या हवाई हद्दीत प्रवेश केलेली आठ क्षेपणास्त्रे रोखल्याचे सांगितले. उघडपणे पुन्हा सुरू झालेला हा संघर्ष संपूर्ण प्रदेशासाठी धोकादायक ठरू शकतो. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणने आखाती देशांमधील अमेरिकी लष्करी तळ तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande