
काठमांडू, 31 ऑगस्ट (हिं.स.)।नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत ९०३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर ४,२४७ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागांतून १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींची संख्या २६७ आहे. दरम्यान, चीनने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली असून, ५०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये रसुवा येथील २४, नुवाकोटमधील ९५, धादिंगमधील ५५, गोरखामधील ६२, पूर्व नवलपरासीमधील २०७, पश्चिम नवलपरासीमधील १५१, तनहुँमधील ३७ आणि चितवनमधील २७२ मृतदेहांचा समावेश आहे. यामध्ये अनेक अज्ञात मानवी अवशेषांचाही समावेश आहे.
नेपाळ सरकारच्या विविध यंत्रणांकडे आतापर्यंत ४,२४७ जण बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. सरकारने सोमवारी सकाळी ११ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे २५, नेपाळी लष्कराचे ४५, सशस्त्र पोलिस दलाचे १३, कस्टम कार्यालयातील १५ आणि इमिग्रेशन कार्यालयातील ३ कर्मचारी आहेत. याशिवाय रसुवा जिल्ह्यातील ८६५ आणि नुवाकोटमधील १,५५८ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बेपत्ता व्यक्तींमध्ये जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित ९३३ जण, मकवानपूरमधील ६५ जण, ५९२ परदेशी नागरिक, परदेशी नागरिकांसोबत प्रवास करणारे १२७ नेपाळी नागरिक, लँगटांग राष्ट्रीय उद्यानातील ३ जण आणि क्वारंटाईन कार्यालयातील ३ जणांचाही समावेश आहे.
नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १०,४५१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. नेपाळी लष्कराच्या हवाई बचाव मोहिमेद्वारे २५२ परदेशी नागरिक आणि ३,३४४ नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अहवालानुसार, ३० ऑगस्टपर्यंत जलविद्युत प्रकल्पांमधून १५ चिनी आणि ७ भारतीय नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे.आतापर्यंत हेलिकॉप्टरच्या ४११ उड्डाणे घेण्यात आली असून, त्यापैकी ३१ ऑगस्ट रोजी १७ उड्डाणे करण्यात आली.
पुरामुळे एकूण २६७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १५६ जणांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. प्रभावित भागांमध्ये सहा सर्जिकल वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. मदत आणि बचावकार्यात एकूण २०,८१९ सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये नेपाळ पोलिसांचे ७,८९४, नेपाळी लष्कराचे ८,७२२ आणि सशस्त्र पोलिस दलाचे ४,२०३ जवान आहेत. प्राधिकरणाने सांगितले की, अज्ञात मृतदेह विविध जिल्ह्यांतील २१ रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रभावित भागांमध्ये इंधनाची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी २५ हजार लिटर डिझेल, २१ हजार लिटर पेट्रोल आणि १० हजार लिटर विमान इंधनाचा साठा उपलब्ध आहे.
त्रिशूली जलविद्युत प्रकल्पासह अनेक बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही सातत्याने सुरू आहेत. बोगद्यांच्या आत सुमारे ४ ते ५ फूटपर्यंत ओला मलबा साचल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बचाव पथकातील एका सदस्याने घटनास्थळी बोगद्याच्या आतील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, मलबा आणि पाण्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode