महिलांना स्वयंरोजगारासाठी शासकीय योजनांची माहिती
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रम लातूर, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासोबतच त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विलासराव देशमुख फ
जनजागृती


विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रम

लातूर, ३१ ऑगस्ट (हिं.स.) : महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासोबतच त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधील महालक्ष्मी मंदिर, गांधी चौक येथे विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्याचे माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘ट्वेंटीवन ॲग्री लि.’च्या संचालिका अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची माहिती यावेळी महिलांना देण्यात आली.

जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लक्ष्मीकांत कैले, व्यवसाय सुविधा केंद्राचे आदित्य देशमुख आणि तांत्रिक व्यवस्थापक तथा फिल्ड ऑफिसर प्रतीक देशमुख यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मिळणारे अनुदान, शासकीय कर्ज योजना, आवश्यक प्रशिक्षण, कागदपत्रे तसेच अर्ज व प्रक्रियेची माहिती प्रतीक देशमुख यांनी दिली. उद्योजकता विकासाच्या विविध संधींचीही त्यांनी माहिती करून दिली.

कार्यक्रमादरम्यान राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘क्विक हिल फाउंडेशन’ आणि ‘सायबर सेल’च्या संयुक्त विद्यमाने वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली. नेहल बुलानी व नम्रता तोर यांनी ऑनलाइन फसवणूक, विशेषतः ओटीपी फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला नगरसेविका श्रावणी बालाजी झिपरे, प्रज्ञा स्नेहल उटगे, विलासराव देशमुख फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, प्रशिक्षक क्रांती उफाडे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे यांच्यासह प्रभाग क्रमांक ८ व गांधी चौक परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित महिलांनी विविध शासकीय योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रज्ञा स्नेहल उटगे यांनी मानले. या उपक्रमामुळे शासकीय उद्योग व स्वयंरोजगाराच्या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande