
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट (हिं.स.) पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर जाणाऱ्या १५ सदस्यीय ऑस्ट्रेलिया 'अ' महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी वेगवान गोलंदाज टायला व्ह्लेमिंक आणि डार्सी ब्राऊन संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. तीन आठवड्यांच्या या दौऱ्यात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक चार दिवसीय सामन्यांचा समावेश असेल.
भारत दौऱ्यादरम्यान, तिन्ही टी-२० सामने न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. तीन एकदिवसीय सामने मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर, तर चार दिवसीय सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
या दौऱ्यामुळे २७ वर्षीय वेगवान गोलंदाज टायला व्ह्लेमिंक दीर्घ काळानंतर स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दुखापतींमुळे तिच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकात खांद्याला गंभीर दुखापत झाल्यापासून, एप्रिलमध्ये 'ग्रीन व्हर्सेस गोल्ड' सराव सामन्यादरम्यान तिने पुनरागमन केले. या वर्षी एप्रिलमध्ये, सततच्या दुखापतींमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिचा केंद्रीय करार संपुष्टात आणला.
दरम्यान, डार्सी ब्राउनचा टी२० विश्वचषकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला नव्हता. तिच्या अनुपस्थितीत, डावखुरी वेगवान गोलंदाज लुसी हॅमिल्टनने संघात आपले स्थान पक्के केले. आता, ब्राउनला ऑस्ट्रेलिया 'अ' संघासोबत स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय निवडकर्ता शॉन फ्लेगलर म्हणाले, टायला आणि डार्सी यांना पुन्हा हिरव्या आणि सोनेरी जर्सीमध्ये पाहून खूप आनंद होत आहे. दोघींनाही आंतरराष्ट्रीय अनुभव आहे आणि तरुण क्रिकेटपटूंना त्यांच्याकडून शिकण्याची उत्तम संधी मिळेल.
ते पुढे म्हणाले, हा दौरा क्रिकेटपटूंना उपखंडातील परिस्थितीत खेळण्याची आणि बलाढ्य आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध स्वतःला आजमावण्याची एक उत्तम संधी आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला भारतीय परिस्थितीतील अनुभव भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे.
एकदिवसीय मालिकेत टाहलिया विल्सन संघाचे नेतृत्व करेल, तर निकोल फाल्टम टी-२० संघाचे आणि रॅशेल ट्रेनमन चार दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचे नेतृत्व करेल. संघातील निम्म्याहून अधिक क्रिकेटपटू २५ वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या आहेत, ज्यात २१ वर्षीय अष्टपैलू फ्रँकी निक्लिन आणि सिएना जिंजर यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया 'अ' महिला संघ (भारत दौरा)
डार्सी ब्राउन, मैटलान ब्राउन, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, सिएना जिंजर, चार्ली नॉट, अनिका लॉईड, केटी मॅक, लिली मिल्स, फ्रँकी निक्लिन, हेली सिल्व्हर-होम्स, रॅशेल ट्रेनमन, कोर्टनी वेब, टाहलिया विल्सन आणि टायला व्ह्लेमिंक.
भारत दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला टी२०: १२ सप्टेंबर, न्यू चंदीगड
दुसरा टी२०: १५ सप्टेंबर, न्यू चंदीगड
तिसरा टी२०: १७ सप्टेंबर, न्यू चंदीगड
पहिला एकदिवसीय सामना: २० सप्टेंबर, मोहाली
दुसरा एकदिवसीय सामना: २३ सप्टेंबर, मोहाली
तिसरा एकदिवसीय सामना: २५ सप्टेंबर, मोहाली
चार दिवसीय सामने: २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, धरमशाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे