दिवसभराच्या अस्थिर व्यवहारानंतर शेअर बाजार घसरणीसह झाला बंद
नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)। क्लोजिंग ऑक्शन सेशनच्या नव्या प्रणालीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजारावर मंगळवारी दबाव कायम राहिला. दिवसभराच्या अस्थिर व्यवहारानं
Stock Market Closing


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)। क्लोजिंग ऑक्शन सेशनच्या नव्या प्रणालीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजारावर मंगळवारी दबाव कायम राहिला. दिवसभराच्या अस्थिर व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.९० लाख कोटी रुपयांची घट झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४३९.९४ अंकांच्या म्हणजेच ०.६३ टक्क्यांच्या वाढीसह ७९,१३२.९७ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७९,१४३.१५ अंकांच्या पातळीवर पोहोचला होता. मात्र त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि निर्देशांक घसरणीच्या दिशेने गेला. खरेदीदारांनी अनेक वेळा बाजार सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रीचा दबाव अधिक असल्याने त्यांना यश आले नाही. दुपारी साडेअकराच्या सुमारास सेन्सेक्सने सकाळची सर्व वाढ गमावून लाल निशाणात प्रवेश केला. त्यानंतरही बाजारात विक्री सुरू राहिल्याने दुपारी दोनच्या सुमारास सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून ९३१.२८ अंकांनी घसरून ७८,२११.८७ अंकांवर पोहोचला. शेवटच्या टप्प्यात झालेल्या खरेदीमुळे काही प्रमाणात सुधारणा झाली आणि सेन्सेक्स २१०.०८ अंकांच्या घसरणीसह ७८,४२८.९५ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७०.४० अंकांच्या म्हणजेच ०.२८ टक्क्यांच्या घसरणीसह २४,७०३.९० अंकांवर सुरू झाला. सुरुवातीपासूनच विक्रीचा दबाव राहिल्याने निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दिवसअखेरच्या काही वेळ आधी निफ्टी ३४६.३५ अंकांनी घसरून २४,४२७.९५ अंकांवर आला होता. मात्र शेवटच्या सत्रातील खरेदीमुळे निफ्टी सावरला आणि १५९.४० अंकांच्या कमजोरीसह २४,६१४.९० अंकांवर बंद झाला.

आज माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. रिअल इस्टेट निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक घसरला. वाहन, तेल आणि वायू तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही कमजोरी राहिली. दुसरीकडे धातू, आरोग्यसेवा, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. आजच्या दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,४३२ शेअर्सचा सक्रियपणे व्यापार झाला. यापैकी २,१०८ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,१२८ शेअर्समध्ये घट झाली, तर १९६ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार झाला नाही. दुसरीकडे, आज एनएसईवर ३,००६ शेअर्सचा सक्रियपणे व्यापार झाला. यापैकी १,३८८ शेअर्स नफ्यासह बंद झाले, तर १,६१८ शेअर्स तोट्यासह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १६ शेअर्स वाढीसह आणि १४ शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर, निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी १४ शेअर्स वाढीसह, ३५ शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि एक शेअर कोणत्याही चढ-उताराशिवाय बंद झाला.

बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सोमवारी ४९२.३१ लाख कोटी रुपये होते. मंगळवारी व्यवहार संपल्यानंतर ते घटून ४८९.४१ लाख कोटी रुपयांवर आले. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे २.९० लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. दिग्गज कंपन्यांमध्ये अपोलो हॉस्पिटल, हिंडाल्को इंडस्ट्रीज, ट्रेंट, जिओ फायनान्शियल आणि आयटीसी या कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. तर ग्रासिम इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मॅक्स हेल्थकेअर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande