सन मराठीच्या 'इच्छा कलश'मधील सीड पेपर विठ्ठलाच्या प्रतिकृतीत रुजवले
मुंबई, 04 ऑगस्ट (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या निमित्ताने ''सन मराठी''ने राबवलेल्या ''इच्छा कलश'' या उपक्रमाला महाराष्ट्रभरातील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारी मार्गावर अनेक भाविकांनी आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि भावना पर्यावरण
Sun


मुंबई, 04 ऑगस्ट (हिं.स.)। आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'सन मराठी'ने राबवलेल्या 'इच्छा कलश' या उपक्रमाला महाराष्ट्रभरातील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारी मार्गावर अनेक भाविकांनी आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना आणि भावना पर्यावरणपूरक सीड पेपरवर लिहून त्या 'इच्छा कलशात' अर्पण केल्या. या उपक्रमाची सांगता पंढरपुरात एका अनोख्या पद्धतीने करण्यात आली.

उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे 'इच्छा कलश'मधील सर्व सीड पेपरची लागवड. विशेष म्हणजे ही लागवड विठ्ठलाच्या प्रतिकृतीच्या आकारात 'सखा माझा पांडुरंग' मालिकेत संत सखुबाईची भूमिका साकारणाऱ्या सान्वी जांबेकर हिच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे श्रद्धा, पर्यावरण आणि विठुरायावरील भक्ती यांचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सीड पेपरमध्ये असलेल्या बियांमधून पुढे रोपे उगवणार आहेत. भाविकांनी श्रद्धेने लिहिलेल्या इच्छा आता मातीत रुजून हिरवाईच्या रूपाने फुलणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला.

याबाबत अभिनेत्री सान्वी जांबेकर म्हणाली, आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाची महापूजा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. 'इच्छा कलश'मध्ये जमा झालेल्या प्रत्येक सीड पेपरमध्ये कोणाच्या ना कोणाच्या मनातील श्रद्धा आणि आशा दडलेल्या आहेत. त्या सीड पेपरची विठ्ठलाच्या प्रतिकृतीत लागवड करताना मन खूप भरून आलं. आज या इच्छा मातीत रुजल्या आहेत. काही दिवसांनी त्यातून रोपे उगवतील आणि त्या प्रत्येक रोपासोबत भक्तांच्या श्रद्धेचाही संदेश पुढे जाईल. भक्ती आणि पर्यावरण यांची अशी सांगड घालणारा हा उपक्रम मला मनापासून आवडला. प्रत्येकाच्या मनातील इच्छा विठुरायाने पूर्ण कराव्यात आणि ही हिरवाई कायम वाढत राहावी, अशी मी प्रार्थना करते.

'सन मराठी'च्या 'इच्छा कलश' उपक्रमाने यंदाच्या आषाढी एकादशीला भक्तांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम दिले. त्याचबरोबर विठ्ठलाच्या प्रतिकृतीत सीड पेपरची लागवड करून श्रद्धेला पर्यावरणाची जोड देत समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेशही पोहोचवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande