
मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। यशराज फिल्म्सच्या (YRF) 'राह रेकॉर्ड्स' या नवीन म्युझिक लेबलने त्यांचे पहिले अधिकृत गाणे 'जादूगरी' प्रदर्शित केले आहे. हे गाणे गायक-गीतकार अमनने साकारले आहे. स्वतंत्र कलाकार आणि स्वतंत्र संगीताला (इंडिपेंडंट म्युझिक) प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या लेबलने, घोषणेनंतर अवघ्या एका दिवसात हे पहिले गाणे सर्व प्रमुख ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले. या गाण्याचे गीतलेखन आणि गायन अमननेच केले आहे.
'जादूगरी' हे एक भावपूर्ण गाणे आहे, जे प्रेम, विरह आणि अशा न बोललेल्या भावनांची कथा सांगते, ज्यांचे खरे महत्त्व अनेकदा नाते संपल्यानंतरच समजते. आपल्या जोडीदाराचे प्रेम आणि सहवास आपण गृहीत धरला होता, याची जाणीव उशिरा होणाऱ्या व्यक्तीच्या भावना हे गाणे प्रभावीपणे मांडते. हृदयस्पर्शी शब्द आणि सुमधुर चाल यामुळे हे गाणे खास बनले आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अमनसोबत अभिनेत्री शिवांगी नेगी झळकली आहे. त्यांनी नात्यातील सुंदर क्षण आणि त्यानंतर निर्माण झालेला भावनिक दुरावा अतिशय संवेदनशीलतेने यात साकारला आहे.
'जादूगरी'च्या माध्यमातून अमन 'राह रेकॉर्ड्स' अंतर्गत आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात करत आहे. अमनची गीतलेखन शैली आणि संगीतातील ओळख अधिक विकसित करण्यासाठी हे लेबल गेल्या वर्षभरापासून त्याच्यासोबत 'टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम' (प्रतिभा विकास कार्यक्रम) अंतर्गत सर्जनशीलतेने काम करत होते. या प्रसंगी बोलताना अमनने या गाण्याचे वर्णन नात्यांविषयीची एक कथा म्हणून केले; ज्यात लोकांना खूप उशिरा जाणीव होते की, छोट्या गोष्टी आणि न बोललेल्या भावनाच सर्वात महत्त्वाच्या असतात. आपल्या प्रियजनांची कदर करावी, असा संदेश हे गाणे लोकांपर्यंत पोहोचवेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.
अमनने आपल्या भावपूर्ण गाण्यांच्या माध्यमातून तरुणांशी आधीच एक घट्ट नाते निर्माण केले आहे. त्याच्या 'रोया था' (Roya Tha) या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता 'जादूगरी'सह, 'राह रेकॉर्ड्स' अंतर्गत संगीत प्रदर्शित करणारा तो पहिला कलाकार ठरला आहे. YRF चे हे नवीन रेकॉर्ड लेबल स्वतंत्र कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि भारतीय मूळ संगीताला (ओरिजिनल म्युझिक) नवी ओळख देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर