रत्नागिरी : खल्वायनच्या 328व्या मासिक संगीत सभेत डॉ. ज्योती काळे डॉ. कविता गाडगीळ यांचे गायन
रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । येथील खल्वायन संस्थेची 328वी मासिक संगीत सभा शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. मैफलीत परमेल प्रवेशक रागरंग या कार्यक्रमात मुंबईच्या प्रसिद्ध
ज्योती काळे


कविता गाडगीळ


रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । येथील खल्वायन संस्थेची 328वी मासिक संगीत सभा शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात होणार आहे. मैफलीत परमेल प्रवेशक रागरंग या कार्यक्रमात मुंबईच्या प्रसिद्ध गायिका डॉ. ज्योती काळे व डॉ. कविता गाडगीळ आठ प्रहरातील आठ रागांवर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत.

परमेल प्रवेशक रागरंग हा डॉ. ज्योती काळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम आहे. शास्त्रीय संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी तसेच गायनाची आवड असणार्या श्रोत्यांसाठी कलात्मक पद्धतीने सादर होणार्या या कार्यक्रमात त्या त्या रागांचे वेगळेपण आणि सौंदर्य उलगडून दाखवले जाणार आहे. डॉ. ज्योती काळे जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका आहेत. सुरवातीला पंडित ए. पी. नारायणगावकर आणि त्यानंतर १५ वर्षे गुरू श्रीमती माणिकताई भिडे, त्यानंतर ७ वर्षे पंडित रत्नाकर पै या थोर गुरूंकडून त्यांना शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच पंडित व्ही. आर. आठवले आणि डॉ. श्रीमती वैजयंतीताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीतातील संगीताचार्य (डॉक्टर इन म्युझिक) ही पदवी मिळविली. मुंबई विद्यापीठाची पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. आकाशवाणीच्या त्या ग्रेडेड आर्टिस्ट असून अनेक स्पर्धांमधून त्यांना अनेक बक्षिसे मिळाली आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी तसेच परदेशामध्ये लंडन, वॉशिंग्टन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, दुबई आदी ठिकाणी त्यांच्या गायन मैफली सादर झाल्या आहेत.

डॉ. कविता गाडगीळ यांना शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन गुरू पद्मजा पुराणिक (कल्याण), गुरू श्रीमती माणिकताई भिडे, गुरू सौ. पद्माताई तळवलकर यांच्याकडून मिळाले. १९८४मध्ये शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. सन २००७ मध्ये पंडित वि. रा. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीताचार्य (डॉक्टरेट) ही पदवी त्यांना मिळाली. संपूर्ण भारतातून प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला. एसएनडीटी विद्यापीठातून त्यांना संगीत विषयासह बी.ए., एम. ए.,एम. फिल. पदव्या प्राप्त आहेत. बी.ए. ला गोल्ड मेडलसह प्रथम येण्याचा मान त्यांना मिळाला होता. काही वर्षांपूर्वी चिपळूण येथे त्या वास्तव्यास होत्या. त्यावेळी त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत संगीत मंदारमाला, संगीत सौभद्र, संगीत मदनाची मंजिरी, संगीत संशयकल्लोळ नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका करून गायनासाठीचे रौप्यपदक मिळविले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यावेळी चिपळूणमध्ये सुमारे ४०० विद्यार्थ्यांना त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे देऊन त्यातील काही विद्यार्थ्यांना संगीत विशारद व संगीत अलंकार पदव्या मिळालेल्या आहेत. २०१३ ते २०२४ या काळात त्या गोरेगाव-मुंबईतील गोएंका इन्स्टिट्य़ूटमध्ये संगीत मार्गदर्शक होत्या. पुणे आकाशवाणीच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार असून भारतातील काही शहरांमध्ये तसेच दुबई येथे त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

या दोघी विदुषींच्या रत्नागिरीतील मैफलीला रत्नागिरीचे नामवंत वादक हेरंब जोगळेकर (तबला) व चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम ) साथ संगत करणार आहेत. अॅड. प्रसाद महाजनी स्मृती आणि श्रीधर (बंडा) आगाशे स्मृती संगीत मैफल म्हणून साजरी होणारी ही मैफल फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि श्रीमती अनिता आगाशे यांनी प्रायोजित केली आहे. या मैफलीचा आस्वाद सर्व रसिक श्रोते व गायन शिकणारे विद्यार्थी व गुरू यांनी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande