हर्षिता जाखर ठरली टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला
नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय युवा सायकलपटू हर्षिता जाखरने प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरून इतिहास रचला आहे. राजस्थानची १९ वर्षीय हर्षिताने रविवारी या खडतर बहु-टप्प्यांच्या सायकल शर्यतीच्या दुसऱ्या टप
हर्षिता जाखर


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय युवा सायकलपटू हर्षिता जाखरने प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरून इतिहास रचला आहे. राजस्थानची १९ वर्षीय हर्षिताने रविवारी या खडतर बहु-टप्प्यांच्या सायकल शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या औपचारिक शुभारंभावेळी आठ प्रतिभावान सायकलपटूंच्या संघाचे नेतृत्व केले.

या संघात अफगाणिस्तान, अल्जेरिया, चिली, इथिओपिया (दोन सायकलपटू), नामिबिया आणि युगांडा येथील खेळाडूंचा समावेश होता. ही स्पर्धा १ ऑगस्ट रोजी लॉझान येथे सुरू झाली आणि ९ ऑगस्ट रोजी नीस येथे संपेल.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियन (UCI) द्वारे निवडलेल्या या विशेष संघाने, UCI वर्ल्ड सायकलिंग सेंटर (WCC) रोड टीममधील काही सायकलपटूंसोबत, शर्यतीच्या मार्गावरील ४.५ किलोमीटरचा न्यूट्रलाइज्ड सेक्शन (स्पर्धात्मक नसलेला सुरुवातीचा टप्पा) पूर्ण केला. UCI च्या मते, उदयोन्मुख प्रतिभेला जागतिक दर्जाचा स्पर्धात्मक अनुभव देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

टूर डी फ्रान्स फेम्स ही एक प्रतिष्ठित बहु-टप्प्यांची महिलांची सायकलिंग शर्यत आहे, जी पुरुषांच्या टूर डी फ्रान्सच्या समकक्ष मानली जाते. ही यूसीआय महिला वर्ल्ड टूर कॅलेंडरवरील प्रमुख स्पर्धांपैकी एक आहे. यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टियर यांनी दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीपूर्वी खेळाडूंचे स्वागत केले आणि भारतीय सायकलपटूंच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. या विशेष पथकाची निवड अशा राष्ट्रीय सायकलिंग महासंघांमधून केली जाते, ज्यांना उच्च-स्तरीय प्रशिक्षण सुविधा आणि स्पर्धांची उपलब्धता नसते.

हर्षिता म्हणाली, लहानपणी माझ्या वडिलांच्या प्रेरणेतून मला सायकलिंगची आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून टूर डी फ्रान्समध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न आहे. महिलांच्या शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला जगभरातील इतर प्रतिभावान सायकलपटूंसोबत सायकल चालवण्याची संधी दिल्याबद्दल मी यूसीआयची आभारी आहे.

ज्युनियर स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित केल्यानंतर, हर्षिताचे ध्येय २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल १० मध्ये स्थान मिळवणे आणि २०३० मध्ये पदक जिंकणे हे आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील लक्ष्य गट खेळाडू हर्षिता, पटियाला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात तिचे वडील आणि प्रशिक्षक राकेश जाखर यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande