
मुंबई, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। पंजाबी गायिका अफसाना खानचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली. अफसानाने सांगितले की, तिचे अकाउंट पुन्हा मिळवण्याची (रिकव्हरी) प्रक्रिया सुरू असून, तोपर्यंत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. तिने चाहत्यांना आवाहन केले की, तिच्या अकाउंटवरून कोणताही संशयास्पद संदेश आल्यास तो दुर्लक्षित करावा आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
व्हिडिओमध्ये अफसानाने हॅकिंगच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत सांगितले की, इन्स्टाग्राम हा त्यांच्यासाठी केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसून चाहत्यांशी संवाद साधण्याचे आणि आपल्या व्यावसायिक घडामोडींची माहिती देण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. एखाद्याच्या वैयक्तिक अकाउंटचा अशा प्रकारे गैरवापर होणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी म्हटले. अकाउंट रिकव्हरीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून, लवकरच आपले अकाउंट परत मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
अफसाना खान या पंजाबी संगीतसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहेत. २०१२ मध्ये 'व्हॉइस ऑफ पंजाब सीझन ३' या रिअॅलिटी शोमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्यासोबत गायलेल्या 'तितलियां' आणि 'धक्का' या गाण्यांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच, २०२१ मध्ये त्या सलमान खान यांच्या 'बिग बॉस १५' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाल्या होत्या. नुकतेच रणवीर सिंहच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटातील 'नाल नचना' या गाण्याला त्यांनी आवाज दिल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर