पोकोने भारतीय बाजारात एम८ मालिकेतील नवीन स्मार्टफोन एम८ पॉवर केला लॉन्च
फ्लिपकार्टवर 7 ऑगस्टपासून एक्सक्लुझिव्ह विक्री मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पोकोने भारतीय बाजारात आपल्या एम८ मालिकेतील नवीन स्मार्टफोन पोको एम८ पॉवर लॉन्च केला आहे. यावर्षी कंपनीने पोको एम८ सादर केल्यानंतर आता अधिक दमदार बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि आ
Poco Launches New M8 Series Smartphone M8 Power


फ्लिपकार्टवर 7 ऑगस्टपासून एक्सक्लुझिव्ह विक्री

मुंबई, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पोकोने भारतीय बाजारात आपल्या एम८ मालिकेतील नवीन स्मार्टफोन पोको एम८ पॉवर लॉन्च केला आहे. यावर्षी कंपनीने पोको एम८ सादर केल्यानंतर आता अधिक दमदार बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि आधुनिक फीचर्ससह हा नवीन स्मार्टफोन ग्राहकांसाठी आणला आहे. विशेष म्हणजे मोठी बॅटरी आणि एमोलेड डिस्प्ले यामुळे हा फोन मध्यम बजेटमधील ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

पोको एम८ पॉवरमध्ये ६.९ इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि तब्बल १,८०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ७आय प्रोटेक्शन देण्यात आले असून, डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी टीयूव्ही आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशनही देण्यात आले आहे. तसेच डिस्प्लेच्या खालीच फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ४ जनरेशन ४ प्रोसेसर देण्यात आला असून तो ४ नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित आहे. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजचा पर्याय मिळतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित हायपरओएस ३ वर कार्यरत आहे. कंपनीने या फोनसाठी चार वर्षे अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एफ/१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबत एआय आधारित सेकंडरी कॅमेराही उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.१ आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची सुविधा देण्यात आली आहे.

या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यातील ८,००० एमएएच क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी होय. या बॅटरीला ४५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच २२.५ वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधाही उपलब्ध असल्याने या फोनद्वारे इतर उपकरणेही चार्ज करता येणार आहेत.

भारतात पोको एम८ पॉवरच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. मात्र लॉन्च ऑफरअंतर्गत हे दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे २१,९९९ रुपये आणि २४,९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहेत. या सवलतीमध्ये पहिल्या १२ तासांसाठी १,००० रुपयांचा कूपन तसेच २,००० रुपयांचा बँक किंवा एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लेझ ऑरेंज आणि ग्रीन या रंगांमध्ये ७ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर एक्सक्लुझिव्ह विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande