किरकोळ वाढीसह शेअर बाजार झाला बंद
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने बुधवारी मजबुतीने सुरुवात केली असली तरी दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुरुवातीची बहुतांश वाढ गमावली. पश्चिम आशियातील होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्
Stock Market Closing


नवी दिल्ली, 05 ऑगस्ट (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजाराने बुधवारी मजबुतीने सुरुवात केली असली तरी दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुरुवातीची बहुतांश वाढ गमावली. पश्चिम आशियातील होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली होती. त्यामुळे बाजारात सुरुवातीला सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

दिवसाच्या दुसऱ्या सत्रात विक्रीचा दबाव वाढल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी काही काळासाठी घसरणीसह लाल चिन्हात पोहोचले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात झालेल्या खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सावरत हिरव्या चिन्हात दिवसाचा शेवट केला. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 0.19 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.04 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्स 626.43 अंकांच्या म्हणजेच 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 79,055.38 अंकांवर उघडला होता. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर लगेचच विक्री सुरू झाल्याने निर्देशांकाची वाढ कमी झाली. दुपारनंतर विक्रीचा दबाव अधिक वाढला आणि सेन्सेक्स दिवसाच्या उच्च पातळीवरून 769.64 अंकांनी घसरून 78,285.74 अंकांपर्यंत खाली आला. शेवटच्या अर्ध्या तासात झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली आणि तो 152.05 अंकांच्या वाढीसह 78,581 अंकांवर बंद झाला.

निफ्टीने 54.30 अंकांच्या वाढीसह 24,669.20 अंकांवर व्यवहाराची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सत्रात खरेदीच्या जोरावर तो 24,677.60 अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, नंतरच्या विक्रीमुळे निफ्टी 24,497.95 अंकांपर्यंत घसरला. शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या जोरदार खरेदीमुळे निफ्टीने 9.75 अंकांची वाढ नोंदवत 24,624.65 अंकांवर व्यवहार समाप्त केला.

आज धातू आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. निफ्टी धातू निर्देशांक 1.58 टक्के आणि वाहन निर्देशांक 1.27 टक्क्यांनी वाढला. याशिवाय ग्राहक टिकाऊ वस्तू, एफएमसीजी, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकातही वाढ झाली. दुसरीकडे तेल आणि वायू, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला.

मध्यम आणि लघु कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 492.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या दिवशी हे बाजार भांडवल 491.15 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.16 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 12 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 18 शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीतील 50 पैकी 26 शेअर्स तेजीत, 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये श्रीराम फायनान्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांचा समावेश झाला. तर टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, एचसीएल टेक्नॉलॉजी, सन फार्मास्युटिकल्स आणि जिओ फायनान्शियल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande