चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीस ६ महिन्यांचा सश्रम कारावास
- ९.९६ लाखांची भरपाई देण्याचे बीड न्यायालयाचे आदेश! बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)। -धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात बीड येथील न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडक निकाल दिला आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल (
चेक बाउन्स प्रकरणात आरोपीस कारावास


- ९.९६ लाखांची भरपाई देण्याचे बीड न्यायालयाचे आदेश!

बीड, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

-धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात बीड येथील न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धडक निकाल दिला आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दाखल (एस.सी.सी. क्र. १४८७/२०१८) प्रकरणात फिर्यादी सोन्याच्या व्यापाऱ्याची तक्रार योग्य ठरवत, न्यायालयाने आरोपी सुरेश हर्ष बडे (रा. बीड) यास दोषी ठरवून ६ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादींचा बीड शहरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. आरोपी सुरेश बडे याने व्यावसायिक व्यवहारातून ₹५,६१,२००/- किंमतीचे सोन्याचे दागिने उधारीवर खरेदी केले होते. या देय रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने एक धनादेश (Cheque) दिला होता. मात्र, सदर धनादेश बँकेत वटवण्यासाठी सादर केला असता Funds Insufficient (खात्यात अपुरी रक्कम) या कारणास्तव तो अनादरित झाला.

या प्रकारानंतर फिर्यादीने कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने थकीत रक्कम अदा केली नाही. त्यामुळे अखेर व्यापाऱ्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत तक्रार दाखल केली. न्यायालयात फिर्यादीच्या वतीने ॲड. तेजस सुभाष नेहरकर यांनी बाजू मांडली. त्यांनी: मूळ धनादेश, बँकेचा परतावा मेमो कायदेशीर नोटीस आणि पोस्टल ट्रॅक रिपोर्ट इतर सर्व दस्तऐवजी पुरावे अतिशय अचूक व कायदेशीरदृष्ट्या भक्कमपणे न्यायालयासमोर सादर केले. बचाव पक्षाने धनादेश केवळ सुरक्षेसाठी दिला होता असा युक्तिवाद करत विविध आक्षेप नोंदवले. परंतु, ॲड. तेजस नेहरकर यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा आधार घेत बचाव पक्षाचे सर्व युक्तिवाद मोडून काढले. आरोपीकडे आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कोणताही विश्वासार्ह पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्या नंतर ॲड. नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी आणि सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत ४ ऑगस्ट २०२६ रोजी पुढीलप्रमाणे कठोर शिक्षा सुनावली.

सश्रम कारावास: आरोपीस ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीने फिर्यादीस ₹९,९६,०००/- ची भरपाई ६० दिवसांच्या आत अदा करावी. ही भरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीस आणखी ३ महिने साधा कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

ॲड. तेजस सुभाष नेहरकर यांच्या अभ्यासू, संयमी आणि कायदेशीर कौशल्यामुळे बीडमधील प्रसिद्ध सोन्याच्या व्यापाऱ्यास अखेर न्याय मिळाला. या संपूर्ण प्रकरणात त्यांना ॲड. गौतम जी. नाईकवाडे, ॲड. इम्रान पटेल, ॲड. रविराज व्ही. राठोड, ॲड. दत्ता केसकर, ॲड. सिकंदर शेख, ॲड. संतोष शेंडगे आणि ॲड. दत्ता खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande