सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा - दिलीप स्वामी
अकोला, 06 ऑगस्ट (हिं.स.)। देशाच्या सर्वांगीण विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) योगदान अत्यंत महत्त्वाचे असून लघु व गृहउद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर
Photo


अकोला, 06 ऑगस्ट (हिं.स.)। देशाच्या सर्वांगीण विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) योगदान अत्यंत महत्त्वाचे असून लघु व गृहउद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.

ते केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय विकास व सुविधा कार्यालय नागपूर यांच्या वतीने अकोला जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आयोजित दोन दिवसीय विक्रेता विकास कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास कार्यालयाचे क्षेत्रीय संचालक व्ही. आर. शिरसाट,वाय.बी.बघेल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जाधव, फेडरेशन ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमेन सुरेश काबरा, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स विदर्भचे महामंत्री निकेश गुप्ता, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज बियानी,अकोला विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नीरव वोरा, युवराज स्टॉलिन, यांच्यासह व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन, विकास आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी लागू करण्यात आलेला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास अधिनियम, २००६ हा उत्पादन व सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. उद्योगांचे वर्गीकरण, पतपुरवठा सुलभ करणे तसेच वेळेवर देयकांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन क्षेत्रीय संचालक व्ही. आर. शिरसाट यांनी केले.

कार्यक्रमात सहभागी उद्योजकांना शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमांना उत्पादने व सेवा पुरविण्याची प्रक्रिया, विविध एमएसएमई योजना, अनुदाने, आर्थिक सहाय्य, गुणवत्ता प्रमाणन तसेच उद्योग विस्ताराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि मोठ्या खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची तसेच नवीन व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्याची संधीही या कार्यक्रमातून उपलब्ध झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande