
परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी गुरुवारी हजूर साहिब नांदेड ते नगरसूल या रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर सुरू असलेल्या अमृत भारत स्थानक योजनेतील विकासकामांची तसेच रेल्वे सुरक्षेसंदर्भातील विविध कामांची सविस्तर पाहणी केली.
यावेळी त्यांनी परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, रोटेगाव आणि नगरसूल या रेल्वे स्थानकांवरील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विकासकामांची गुणवत्ता आणि गतीची तपासणी करत प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि उच्च दर्जा कायम ठेवत सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. दौर्यादरम्यान प्रदीप कामले यांनी हजूर साहिब नांदेड ते नगरसूल या मार्गाचे रिअर विंडो निरीक्षणही केले. यामध्ये रेल्वे मार्ग, पूल, रेल्वे फाटक, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड विद्युत उपकरणे, स्थानक परिसर तसेच इतर रेल्वे पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. मार्गावरील सुरक्षा कामांचा आढावा घेत सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर त्यांनी विशेष भर दिला. या पाहणीदरम्यान अभियांत्रिकी, विद्युत, टीआरएसओ, ट्रॅक्शन, सिग्नल व दूरसंचार, वाणिज्य, परिचालन, गतीशक्ती तसेच सुरक्षा विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागांच्या अधिकार्यांनी आपल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीची माहिती डीआरएम यांना सादर केली. यावेळी प्रदीप कामले यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे आणि नांदेड रेल्वे विभागातील परिचालन सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis