
यवतमाळ, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने युवक बिरादरी भारतच्या वतीने ‘हिरवे अंगण’ या उपक्रमांतर्गत राळेगाव येथील पेस सेंटर परिसरात शंभर केसर आंब्यांच्या रोपांची लागवड करून वनराई उभारण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे बिरादरी वन तयार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. श्री सत्यसाई सेवा संघटना नागपूर व यवतमाळ यांच्या सौजन्याने तसेच पेस सेंटर राळेगाव यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. पर्यावरणीय मूल्यांची जपणूक, भू-संरचनेचे संरक्षण, परिसंस्थेचे संवर्धन आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी युवक बिरादरी भारतचे कार्यकारी संचालक नीलेश सोनटक्के, सचिन वाकूळकर, सत्यसाई सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र ढवळे, जिल्हाध्यक्ष गजानन अरगुलवार, निवृत्त वनाधिकारी आत्माराम राठोड, प्रबोधनकार आकाश टाले, सुमीत झोटिंग, रुषभ राऊत, शुभम देव्हारे, युवक बिरादरीचे यवतमाळ प्रतिनिधी चेतन राठोड यांच्यासह युवक उपस्थित होते. हा उपक्रम पद्मश्री क्रांती शहा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी निसर्ग संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश टाले यांनी केले. तर नीलेश सोनटक्के यांनी प्रास्ताविकातून युवक बिरादरीच्या ‘हिरवे अंगण’ या उपक्रमाची भूमिका, उद्दिष्टे आणि राज्यभर राबविण्यात येणार्!या हरित अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे विभागीय प्रमुख आशिष इंगळे यांनी पुढाकार घेतला पर्यावरण संवर्धनासाठी युवकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, आगामी काळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा वनराया उभारण्याचा निर्धार युवक बिरादरीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
---------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी