
परभणी, 06 ऑगस्ट (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद बैठक परभणी येथे सुरू असताना विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे वतीने विद्यापीठ उपकेंद्रावर टाळनाद आंदोलन करण्यात आले.
प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, परभणी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यात आले असले तरी गेल्या चार वर्षांपासून ते भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहे. उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून पूर्णवेळ संचालक, आवश्यक अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पारंपरिक बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून 600 इंटरनेट शुल्क आकारले जात असून, संबंधित अभ्यासक्रमांमध्ये इंटरनेट सुविधेचा प्रत्यक्ष वापर होत नसताना ही आकारणी अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.
अभाविपच्या महानगर मंत्री गायत्री लाड यांनी परभणी उपकेंद्रात बी.ए. डमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली. या अभ्यासक्रमामुळे एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून जिमखाना शुल्क, लायब्ररी डिपॉझिट, कुलगुरू कार्यालय कार्यक्रम शुल्क आदी विविध शुल्क आकारले जात असले तरी अनेक ठिकाणी त्या बदल्यात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी उपस्थित केली. ज्या महाविद्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत, तेथील विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क परत करावे आणि सुविधा उपलब्ध होईपर्यंत अशी शुल्क आकारणी थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मराठा आरक्षण (एसईबीसी) अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शासकीय शैक्षणिक सवलतींची तातडीने अंमलबजावणी करावी, परभणी उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, पारंपरिक अभ्यासक्रमांवरील इंटरनेट शुल्क रद्द करावे आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक आर्थिक भार कमी करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी टाळनाद करून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री गायत्री लाड, विभाग विद्यार्थिनी प्रमुख सेजल काळे, विभाग संयोजक मुक्तेश भंडारे, महानगर सहमंत्री ओमकार डोके, हरीश मोरे तसेच अभाविपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis