
अमरावती, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
येथील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील अनियमितता आणि वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन शिक्षकांवर मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन सहायक शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली असून, एका मुख्याध्यापकाला वैद्यकीय मंडळामार्फत तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषद कार्यालयाने ४ ऑगस्टला हे तीन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
नगरपरिषदेच्या शाळांची माहिती, वरिष्ठ कार्यालयाच्या सूचना, शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता याबाबत शासनाचे उपक्रम व सूचना आपल्या नगरपरिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांपर्यंत पोहोचवणे व संबंधित इतर कामे करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दोन शिक्षकांकडे केंद्र समन्वयक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. अनिल धारणे, अमोल तिडके अशी त्यांची नावे आहेत.
मात्र, दोन्ही शिक्षकांनी सदर आदेश न स्वीकारता परत केला व अतिरिक्त कार्यभार काढण्याबाबत पत्र दिले. मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी याला नियुक्ती आदेशाची अवहेलना मानले आहे. हे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त अपिल व वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र आहे, असे नमूद करून दोन्ही शिक्षकांची माहे जुलै-२०२६ ची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.
मुख्याध्यापक मो. शफीक गुलाम कादिर यांच्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, कादिर यांना आपणाकडे वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात येत आहे. त्यांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करून तपासणी अहवाल देण्यात यावा. कादिर यांना हे पत्र मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून आपली वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. नगरपरिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि प्रशासनात शिस्त आणण्यासाठी मुख्याधिकारी लोहकरे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. पथदिवे देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे सुपरवायझर शुभम बोरोडे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी