
धुळे, 06 ऑगस्ट, (हिं.स.) - तालुक्यातील बोरकुंड गावावर मंगळवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील प्रगतिशील शेतकरी व श्री जनार्दन स्वामी कृषी सेवा केंद्राचे संचालक अशोक दिनकर भदाणे वय ५८ आणि त्यांच्या पत्नी सौ. लता अशोक भदाणे वय ५२ यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून, बोरकुंड गावात भरत असलेला आठवडी बाजारही शोकमय वातावरणामुळे ओस पडला. अशोक भदाणे व त्यांच्या पत्नी सौ लता भदाणे हे दुचाकी (क्र. MH-18 Au-9957) हिचेने धुळ्याहून बोरकुंडकडे परतत होते. गरताड गावाजवळील रेल्वे पुलावर त्यांच्या दुचाकीला MH-18 CE-1839 क्रमांकाच्या ब्रेझा कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचा मृत्यू झाला. अशोक भदाणे हे परिसरातील शेतकऱ्यांचे विश्वासू मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर